Tue, Apr 23, 2019 07:56होमपेज › Satara › भाजप व काँग्रेसला पर्याय उभा करू : हेमंत पाटील

भाजप व काँग्रेसला पर्याय उभा करू : हेमंत पाटील

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 10:49PMसातारा : प्रतिनिधी

मागील काँग्रेसच्या आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेची भ्रष्टाचार व महागाई करून फसवणूक केली त्यामुळेच त्यांची सत्ता गेली. भाजपाने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे. भाजप सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली राजकारण करून भांडणे लावून आपली पोळी भाजत आहे. आगामी निवडणूकीत भाजप व काँग्रेसला पर्याय उभा करू, असा इशारा भारत अगेन्स्ट करप्शन व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिला. 

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हेमंत पाटील यांनी म्हटले आहे, आघाडी सरकारला लोक कंटाळले होते. गांधी घराण्याला पुढे करून काँग्रेसचे काही नेते राजकारण करून सत्ता स्थापन करत होते. मात्र, काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली. भाजप सरकार वचननाम्याने निवडून आले. तो वचननामा त्यांनी बासनात गुंडाळला. काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजप, काँग्रेसचे नेते पैशाच्या जोरावर निवडून येतात. मतदारांना अनेक प्रकारची प्रलोभने व अमिषे दाखवतात. भरमसाठ पैसे खर्च करून दिशाभूल करून आमदार, खासदार बनत आहेत. पूर्वीचा मतदार आता राहिलेला नाही. आता मतदार शहाणा झाला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही विधानसभा व लोकसभा निवडणूकीत भाजप व काँग्रेसला छोट्या छोट्या पक्षाच्या आघाडीच्या माध्यमातून पर्याय उभा करू, असेही पाटील यांनी या पत्रकात स्पष्ट केले आहे.