Sun, Jan 19, 2020 22:45होमपेज › Satara › कृष्णाभीमा स्थिरीकरणाला सोमंथळी शेतकर्‍यांचा विरोध

कृष्णाभीमा स्थिरीकरणाला सोमंथळी शेतकर्‍यांचा विरोध

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 11:10PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

कृष्णाभीमा स्थिरीकरणाच्या प्रकल्पामुळे सोमंथळी (ता. फलटण) येथील शेतकर्‍यांना नुकसान भरपाईपोटी दिला जाणारा मोबदला मान्य नाही. त्यामध्ये घरे, विहिरी, पाईपलाईन, फळबागा आदिंचे नुकसान विचारातच घेतलेले नाही. नवीन भूसंपादन कायद्यानुसार शेतकर्‍यांना  एकरी चाळीस लाखांची भरपाई द्या, अन्यथा प्रकल्पाचे काम बंद पाडू ,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना व संबंधित शेतकर्‍यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कृष्णाभीमा बॅरेजचे काम सुरु असून भूसंपादन क्र. 2 ने संबंधित शेतकर्‍यांना भूसंपादनाची नोटीस दिली आहे. निवाड्यामध्ये गटवार एकत्र दिलेली रक्‍कम मान्य नसून बागायत असलेल्या शेतजमिनी जिरायत दाखवण्यात आल्या आहेत. जिरायताप्रमाणे दिलेला मोबदला मान्य नाही.  भूसंपादित करण्यात येणार्‍या शेतीची फेर मोजणी झाली पाहिजे. नुकसानीचा मोबदला गटवार न देता शेतकर्‍यांच्या वहिवाटीप्रमाणे हिश्श्यावर वेगवेगळा द्यावा, पक्‍की घरे, जनावरांचे गोठे, विहिरी, पाईपलाईन तसेच 200 हून अधिक फळझाडे आहेत. याचाही वेगळा मोबदला मिळाला पाहिजे. जुन्या आकारणीप्रमाणे केलेला हुकूमनामा मान्य नाही. मागण्या मान्य न झाल्यास प्रकल्पाचे काम बंद पाडू, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.  स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष  शंकर शिंदे, अलीभाई इनामदार, धनंजय महामुलकर, शेतकरी उपस्थित होते.

26 जानेवारीला फलटण प्रांत कार्यालयासमोर उपोषण

सोमंथळी येथील संपादित करण्यात येणारे शेती क्षेत्र बागायत असतानाही जिरायत म्हणून पंचनामे करण्यात आले. वर्णनातून शेतीचे नुकसान कमी होत असल्याचे दाखवण्यात आल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. बनावट कागदपत्र तयार करणार्‍या संबंधित महसूल कर्मचार्‍यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करा. अन्यथा दि. 26 जानेवारी रोजी फलटण प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करणार, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.