Wed, Jul 17, 2019 10:37होमपेज › Satara › ‘लाचलुचपत’चा पोलिसांवर ‘डबलबार’

‘लाचलुचपत’चा पोलिसांवर ‘डबलबार’

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 11:00PMसातारा : प्रतिनिधी

शुक्रवारी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिवसभरात दहिवडी व म्हसवड येथे सापळा कारवाई करून ‘डबलबार’ उडवून दिला. दहिवडीचा फौजदार सतीश राजाराम दबडे (वय 55, मूळ रा. सातारा) याने लाचेचे 13 हजार रुपये स्वीकारल्यानंतर सापळा लावला असल्याचे त्याच्या लक्षात येताच कारमधून तशीच धूम ठोकली. धक्‍कादायक बाब म्हणजे यावेळी एसीबी पोलिसांनी दबडे याला कार थांबवण्यास सांगितले असतानाही त्याने कार न थांबवता तशीच दामटली. दरम्यान, सायंकाळी उशिरा म्हसवड येथे बबन पवार याच्यावरही ट्रॅप झाला आहेे.

दहिवडी येथील एसीबीच्या कारवाईबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक आहेत. तक्रारदार यांच्या बीअर बार हॉटेलवर कारवाई झालेली होती. याबाबतची कार्यवाही दहिवडी पोलिस ठाण्याचा फौजदार सतीश दबडे याच्याकडे होती. हॉटेलवरील त्या कारवाईचा रिपोर्ट कलेक्टर ऑफिसला पाठवला जाऊ नये यासाठी तक्रारदार यांच्याकडे फौजदार दबडे याने 25 हजार रुपयांची मागणी केली.

तक्रारदार यांच्या हॉटेलवरील कारवाईचा रिपोर्ट जिल्हाधिकारी कार्यालयात न पाठवण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर तक्रारदार यांनी     सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दि. 8 रोजी तक्रार केली. सातारा एसीबीने पडताळणी केली असता तडजोडीअंती त्यातील 13 हजार रुपये घेण्याचे ठरले. शुक्रवारी लाचेची रक्‍कम स्वीकारली जाणार असल्याने सातारा एसीबीने दहिवडी येथील पोलिस ठाण्याजवळ सापळा रचला.

तक्रारदार यांच्याकडून फौजदार सतीश दबडे याने लाचेची रक्‍कम त्याच्या कारमध्ये स्वीकारली. लाचेची रक्‍कम स्वीकारल्यानंतर एसीबीचे पोलिस त्या दिशेने निघाले. एसीबीचा ट्रॅप होणार असल्याचे लक्षात येताच फौजदार सतीश दबडे याने त्याची कार सुरु केली. यावेळी एसीबीचे पोलिस त्याला थांबण्यासाठी प्रयत्न करत असतानाच दबडे याने कार तशीच भरधाव वेगाने निघून गेला. भर रस्त्यावर व वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेनंतर उपस्थितांच्या काळजाचाही ठोका चुकला. या गडबडीत पोलिस हवालदार संभाजी काटकर व अजित कर्णे हे दोघे किरकोळ जखमी झाले. अशा परिस्थितीमध्येही एसीबी पोलिसांनी तत्काळ त्यांचेही वाहन सुरु करुन दबडे याला पकडण्यासाठी पाठलाग केला. मात्र, दबडे एसीबीच्या पथकाला सापडला नाही.

घडलेल्या सर्व घटनेनंतर एसीबी विभागाने दहिवडी पोलिस ठाण्यात जावून फौजदार सतीश दबडे याच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली तक्रार दिली असून तसा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बयाजी कुरळे, पोलिस हवालदार अजित कर्णे, विनोद राजे, संभाजी काटकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

दरम्यान, अन्य एका कारवाईत पोलिस हवालदारावर गुन्हा दाखल असून त्यालाही रंगेहाथ पकडले.  एसीबीने शुक्रवारी दुपारी कारवाई झाली असतानाच सायंकाळी पोनि आरिफा मुल्‍ला यांचे पथक म्हसवड येथे सापळा लावून थांबले होते. तक्रारदारावर गुटखा विक्रीची कारवाई झाली होती. त्यामध्ये मदत करण्यासाठी पोलिस हवालदार बबन काळू पवार (वय 42) याने  2 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराकडून लाचेची रक्‍कम स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. रात्री उशीरापर्यंत पवार याच्याविरूद्ध गुन्हा  दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर किंवा सातारा जिल्हा कोषागार कार्यालयाजवळील एसीबी विभागात तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

काटकर, कर्णे बचावले..

दहिवडी येथे एसीबीच्या विभागाकडून कारवाई सुरू असताना संशयित सतीश दबडे याने कार सुरू करून तेथून पळाला. दबडे घटनास्थळावरून पळून जात असल्याचे सापळा कारवाईत असलेले पोलिस हवालदार संभाजी काटकर व अजित कर्णे यांनी क्षणात कार थांबवण्यासाठी घटनेच्या दिशेने धाव घेतली. मात्र, दबडे याने भीतीपोटी तेथून कार तशीच दामटली. सुदैवाने पोलिस हवालदार काटकर व कर्णे दोघे बाजूला झाले व ते बचावले. हा सर्व थरार अवघ्या एका मिनिटांमध्ये घडल्याने घटनास्थळी उपस्थित असणार्‍या नागरिकांमध्ये खळबळ उडाली.