Fri, May 29, 2020 19:18होमपेज › Satara › ओपन स्पेस, खासगी जागा ‘स्वच्छ’कराडची डोकेदुखी

ओपन स्पेस, खासगी जागा ‘स्वच्छ’कराडची डोकेदुखी

Published On: Jul 25 2019 1:51AM | Last Updated: Jul 24 2019 9:17PM
कराड :  चंद्रजित पाटील

सलग दोन वर्षे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कराड शहराने राज्य तसेच देशपातळीवर चमकदार कामगिरी करत नावलौकिक मिळवला आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत पालिका पदाधिकार्‍यांचा गौरवही करण्यात आला. मात्र, कराड शहरातील अनेक खासगी जागा, पालिकेने आरक्षित केलेल्या जागांसह ओपन स्पेस स्वच्छ कराडची डोकेदुखी ठरू लागले आहेत. पालिकेच्या जागांसह खासगी जागेत कालबाह्य आणि अपघातग्रस्त वाहने उभी असण्यासोबत कचरा टाकण्यात येत आहे. काही खासगी जागांबाबत न्यायालयात दावे सुरू आहेत. मात्र, जागेवरील परिस्थिती कायम ठेऊन जागा मालक आणि ज्यांनी दाखल केले आहेत, अशा लोकांच्या परवानगीने संबंधित जागांची स्वच्छता केली गेल्यास कराडच्या स्वच्छतेत भरच पडणार आहे. त्यासाठी पालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्यस्थितीत खासगी जागा, ओपन स्पेस आणि पालिकेच्या आरक्षित जागेत झाडाझुडपांचे साम्राज्य निर्माण झाले असून या अस्वच्छ जागा डोकेदुखी ठरत आहेत.

येथील बीएसएनएल कार्यालय परिसरात रणजित टॉवर समोरील ही जागा वर्षानुवर्ष जैसे थे त्या परिस्थितीत आहे. कराडमध्ये प्रवेश करणारी अनेक वाहने याच मार्गावरून शाहू चौक मार्ग दत्त चौकाकडे जातात. सध्यस्थितीत या जागेवर जनावरे चरताना दिसतात. याशिवाय काही मोडकळीस आलेली आणि सुस्थितीतील वाहनेही या ठिकाणी उभी केलेली असतात. मोठ्या प्रमाणावर उगवलेली झाडुझुडपे, प्रचंड अस्वच्छता अन् रहदारीचा मार्ग यामुळे या ठिकाणाहून गेल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग दोन वर्ष नावलौकिक प्राप्‍त करणार्‍या कराडबद्दल वेगळाच विचार लोकांच्या मनात येतो. त्यामुळेच याठिकाणी स्वच्छता होणे गरजेचे बनले असून पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

माजी नगरसेवक महादेव पवार यांच्या निवासस्थानासमोरून बैलबाजार आणि कराड - तासगाव या मार्गाला जोडणारा एक मार्ग जातो. या मार्गालगत रिकाम्या जागेत पाच ते दहा फुटांची झाडेझुडपे असून या ठिकाणी कचराही टाकला जातो. त्यामुळेच याठिकाणी एका खांबावर नगरपालिका प्रशासनाने ‘उष्टे, शिळे, खरकटे अन्न टाकू नये, असा फलक लावला आहे. तसेच नियम मोडणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल’, असेही नमूद करण्यात आले आहे. त्यानंतरही बुधवारी सकाळी याठिकाणी कचरा टाकण्यात आला होता. त्यामुळेच ‘स्वच्छ कराड’मध्ये आजही काही नागरिक स्वच्छतेसह कराडच्या हिताबाबत उदासिन असल्याचे दुर्दैवी समोर आले आहे.

स्व. पी. डी. पाटील उद्यानसमोरील जागेत मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे उगवली आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. ही जागा खासगी असेल तर संबंधितांना जागेची स्वच्छता करण्यास सांगण्याची गरज आहे. रस्त्याकडेला या जागेतील सध्यस्थितीत निश्‍चितपणे कराडसाठी भूषणावह नाही. कराडचा नावलौकिक कायम राहण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे याठिकाणी पहावयास मिळते.

 

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी वैयक्तीक क्रीडा प्रकारात देशाला सर्वप्रमथ पदक मिळवून दिले. कराडच्या या सुपूत्रांच्या कामगिरीला उजाळा देत युवा पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, यासाठी कार्वे नाका परिसरात नगरपालिकेने स्मृतीस्तंभ उभारला आहे. याच परिसरात ऑलिम्पिकचे बोधचिन्हाची प्रतिकृती असून झाडांमुळे बोधचिन्ह व्यवस्थित दिसत नाही. धक्कादायक बाब म्हणजे याठिकाणी मोकाट कुत्र्यांचाही वावर असतो. शहराच्या दर्शनी भागातील हे चित्र भयावह असेच आहे.

कोल्हापूर नाका परिसरात पोपटभाई पेट्रोल पंपामागे कोल्हापूर नाक्यावरून शाहू चौक, भेदा चौकाकडे जाणार्‍या मार्गालगतच्या या जागेतील अस्वच्छता नेहमीच चर्चेचा विषय असतो. कराडमध्ये प्रवेश करतानाच अस्वच्छता दिसत असल्याने खासगी जागांची स्वच्छता करण्याची जबाबदारी पालिकेची की संबंधित जागा मालकाची ? असा प्रश्‍न निर्माण होतो. पालिका प्रशासन अनेकदा स्वच्छता करते, मात्र त्यानंतरही काही नागरिक याठिकाणी कचरा आणून टाकतात. त्यामुळेच कराडच्या प्रवेशद्वारानजीकच्या या जागेत कचरा टाकणार्‍यांवर कठोर कारवाई गरजेची आहे.

जयवंतराव जाधव आर्केडनजीक कराड हॉस्पिटलसमोर असलेली रिकामी जागा म्हणजे अस्वच्छेचा उत्तम नमुना आहे. या ठिकाणी कचरा असून झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर उगवली आहेत. कोल्हापूर नाका परिसरात पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यामुळे या जागेची व्यवस्थित स्वच्छता करून संबंधित जागा पार्किंगसाठीही वापरली जाऊ शकते. खाजगी जागा मालक अथवा पालिकेला यापासून उत्पन्नही मिळणार असून कोल्हापूर नाका परिसरातील वाहतूक कोंडीलाही काही प्रमाणात का होईना, पण चाप बसेल.

कराडमध्ये वाहतूक कोंडीला रस्त्यावर बसणारे भाजी विके्रते काही प्रमाणात का होईना, पण कारणीभूत आहेत. त्यामुळेच शनिवार पेठेतील संभाजी भाजी मार्केटमध्ये संबंधितांनी बसावे, यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्नही झाले होते. मात्र नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे पालिका प्रशासनाची अवस्था आहे. सध्यस्थितीत संभाजी भाजी मार्केटमध्ये काही रिक्षा, कार उभ्या असल्याचे दिसते. विशेष म्हणजे ही वाहने पाहिल्यास ती किती दिवसांपासून याठिकाणी आहेत ? हे सांगावेच लागत नाही. त्यामुळे भाजी मार्केट आहे की पार्किंगचा अड्डा ? हेच समजत नाही.