Tue, Mar 19, 2019 09:15होमपेज › Satara › कराडच्या स्वच्छतेचे शिलेदार

कराडच्या स्वच्छतेचे शिलेदार

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 9:01PMकराड : अमोल चव्हाण

कराडमधील एखाद्या ठिकाणचे ड्रेनेज तुंबल्यास आपल्याला ते स्वच्छ करणार्‍यांची त्वरित आठवण होते. इतर वेळेस हे काम करणारे दिसले, तरी काहींना मळमळल्यासारखे होते. काम सुरु असलेल्या ठिकाणापासून जाण्याचे कोणी धाडस करत नाही. त्यातूनही तशी वेळ आल्यास अनेकजण नाक मुठीत धरून जात असतात. मात्र, कराडच्या ड्रेनेज विभागाचे केवळ सोळा कर्मचारी गेली 20 ते 25 वर्षांपासून ड्रेनेजच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. म्हणूनच शहरातील नागरिक कचरा किंवा घाण करतात आणि हाच कचरा अथवा घाण स्वच्छ करून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारे ते सोळाजण खरे आरोग्य दूतच आहेत.

शहर असो किंवा गाव, ते स्वच्छ ठेवण्यासाठी शासकीय पातळीवर विविध योजना आखल्या जातात. परंतु, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम खर्‍या अर्थाने शहराची स्वच्छता करणार्‍यांवरच असते आणि तेच खरे स्वच्छता दूत असतात. शहराच्या स्वच्छतेसाठी त्यांची नेहमीच धडपड सुरु असते. तरीही ते कधीच प्रकाशझोतात नसतात किंवा त्यांच्या कामाचे कौतुक होताना दिसत नाही. किंबहुना त्याचे काम व तेही समाजापासून नेहमीच दूर असतात. आपले काम भले आणि आपण असे म्हणून ते शहरातील ड्रेनेजची व्यवस्था कशी अधिकाधिक चांगली राहिल, यासाठी प्रयत्न करत असतात. 

कराडमधील ड्रेनेजच्या कामाचा विचार करता महिन्याला 150 ते 175 तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त होतात. तक्रार आल्यानंतर ती कोणत्या भागातील आहे, याची माहिती घेऊन ड्रेनेज विभागाचे कर्मचारी तेथे हजर होतात. नेमके कोणते चेंबर तुंबले आहे. ते स्वच्छ करण्यासाठी इतर कोणत्या चेंबरचे झाकण काढले, तर तुंबलेल्या चेंबरमधील पाणी निघून जाईल याची माहिती घेतली जाते. गेली 20 ते 25 वर्षांपासून हे काम करत असल्याने शहरातील सर्व ठिकाणची चेंबर माहिती असल्याचे सांगून प्रकाश नामदेव वायदंडे, स्वप्नील दिलीप सरगडे, संजय चंद्रकांत लाड, सुभाष राजाराम भिसे, संजय प्रल्हाद भोसले, कृष्णत जगन्नाथ लाड यांनी सांगितले की, नेमका घोटाळा कोठे होऊ शकतो? कोणता चेंबर उघडल्यानंतर तुंबलेला चेंबर रिकामा होईल? हे आम्हाला माहिती झाले आहे.

त्यामुळे एखाद्या ठिकाणची तक्रार आल्यानंतर ते  जाऊन पाहणी केली, की आम्ही प्रथम परिसराची माहिती घेतो. तुंबलेले गटर स्वच्छ करण्यासाठी तोेंडाला मास्क लावून आम्ही प्रथम तुंबलेल्या चेंबरचे झाकण काढून त्यामधील गॅस जाईपर्यंत म्हणजेच साधारणपणे अर्धा तास बाजूला जातो. कारण ड्रेनेज तुंबल्यामुळे त्यामध्ये गॅस तयार झालेला असतो आणि तो गॅस प्रचंड धोकादायक असतो. चेंबरचे झाकण काढल्यानंतर रॉडींंग करून तुंबलेले गटर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, रॉडींग करूनही ते स्वच्छ होत नसेल, तर डी चोकींग मशीनचा वापर करून चेंबर स्वच्छ केला जातो.

तुंबलेल्या गटरमधील पाणी निघून गेल्यानंतर ते कशामुळे तुंबले होते? पुन्हा असा प्रकार घडू नये, म्हणून काय उपाययोजना कराव्या लागतात हे पाहिले जाते. त्याबाबत वरिष्ठांच्या सूचनेनुसार कार्यवाही केली जाते. घाण पाणी निघून गेल्यानंतर त्यातील गाळ काढला जातो. तो काढलेला गाळ नगरपालिकेच्या गाडीत किंवा जवळपास कुंडी असल्यास त्यामध्ये टाकला जातो. शहरात साधारणपणे सहा इंचापासून दहा, बारा इंच ते दीड फुटापर्यंत मोठ्या ड्रेनेजच्या पाईप्स असून त्या घराबाहेरील छोट्या चेंबरपासून ते जमिनीमध्ये सुमारे 40 ते 50 फूट खोलवर असतात. एवढ्या खाली जाऊन काही वेळेस काम करावे लागते. खोलवर जाऊन काम करणे गरजेचे असल्यास अंगाला दोरी बांधून चेंबरमध्ये उतरावे लागते, असेही त्यांनी सांगितले.   

‘त्यांच्या’ आरोग्याचाच कचरा 

कराड : चंद्रजित पाटील

आज घंटागाडी आणि त्यावरील कर्मचार्‍यांमुळेच कराड शहर स्वच्छ दिसत आहे. त्यांच्यामुळेच कराड ‘कचरा कुंडी मुक्त’  झाले आहे, हेही वास्तव नाकारून चालणार नाही. मात्र असे असले तरी घंटागाडीद्वारे कचरा गोळा करताना संबंधित कर्मचारी आपल्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि आजवर नगरपालिकेने याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळेच घंटागाडीद्वारे कचरा गोळा करणार्‍या कर्मचार्‍यांच्या आरोग्याचाच कचरा झाल्याचे दिसत आहे. 

आज सर्वच दृष्टिकोनातून सफाई कामगार हा दुर्लक्षित होत चालला आहे. लोकांना स्वच्छता हवी; पण घराशेजारी कचरा पेटी नको आहे. बहुतांश सफाई कामगार हा सुशिक्षित नाही. त्यामुळे हे कामगार स्वतःच्या आरोग्याबाबत उदासिन असल्याचे पहावयास मिळते. या साफसफाई कामांचा त्यांना मेहनताना मिळतो. पण आजच्या सुशिक्षित आणि प्रगत अशा या युगात हाती झाडू घेऊन काम करायला कोणीही तयार नाही. तरीही ही सेवा ते प्रामाणिकपणे पार पाडत असतात. सफाई कामगारांना प्रोत्साहन देणे, ही गरज आहे. स्वच्छ भारत अभियान राबवताना सफाई कामगारांसाठी बक्षीस योजना जाहीर केली असती, तर या स्वच्छतेला चार चाँद लागले असते.

कराडात दररोज दारोदारी ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी फिरते. काही ठिकाणी ट्रॅक्टरचाही वापर होताना दिसतो. प्रत्येक कचरा गोळा करणार्‍या वाहनात मग ट्रॅक्टर असो वा घंटागाडी असो, एक कर्मचारी लोकांची बकेट घेऊन त्यातील कचरा वाहनात ओतत असतो. मात्र यावेळी संबंधित कर्मचार्‍याने पायात गमबूट घातलेला नसतो. अंगात रेनकोट अथवा सुरक्षितता म्हणून कोणतीही विशेष उपाययोजना केलेली नसते.

अनेकजण नेहमीचाच ड्रेस घालतात, काहीजण हातात हातमोजे घालतात. मात्र बहुतांश कर्मचारी मात्र हातमोजे, मास्क, यासह अन्य सुरक्षा साधनांचा वापरच करताना दिसत नाहीत. कर्मचार्‍यांच्या ‘आरोग्याचाच कचरा’ झाल्याचे दुर्दैवी पण तितकेच धक्कादायक चित्र निर्माण झाले आहे. कर्मचारीही हा माणूसच असून किमान त्यांना माणसांप्रमाणेच वागणूक मिळणार का? हाच यशप्रश्‍न निर्माण झाला आहे.

 

Tags : karad, karad news, Karad drainage department, employees,