Tue, Sep 25, 2018 06:37होमपेज › Satara › प्राधिकरणामुळेच काविळ फैलावली 

प्राधिकरणामुळेच काविळ फैलावली 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सातारा शहर व परिसरातील उपनगरात दुषित पाणी पुरवठा होत असल्यानेच ऐन उन्हाळ्यात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. शहरात ठिकठिकाणी काविळीचे रूग्ण आढळून आले असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे स्पष्ट झाले आहे. कावीळीबाबत नागरिकांनी काळजी घ्यावयाची असली तरी दुषित पाणी पुरवठ्याला प्राधिकरणच जबाबदार आहे. त्यामुळे प्राधिकरणाचा भोंगळ कारभार सुधारणार आहे तरी केव्हा? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.  

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत दररोज सातारा शहर व परिसरातील उपनगरात पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या जलवाहिनी जुन्या असल्याने अनेक ठिकाणी या जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच गळती लागलेल्या जलवाहिन्यामध्ये गटाराचे सांडपाणी जात आहे. त्यामुळे नागरिकांना दुषित पाणीपुरवठा होत आहे. 

याबाबत शाहुपूरी येथील नागरिकांनी वेळोवेळी प्राधिकरणाकडे दुषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली होती तसेच या पाणीपुरवठ्यामुळे साथीच्या रोगांने थैमान घातले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्राधिकरणाने जलवाहिन्यांची पाहणी करून काही ठिकाणच्या जलवाहिन्यांची गळती काढली होती. तसेच पोवईनाका येथे जलवाहिनीमध्ये मेलेले कुत्रे सापडले होते. त्यावेळी शाहूपुरीसह उपनगरातील नागरिकांनी प्राधिकरणामध्ये धाव घेवून अधिकारी व कर्मचार्‍यांना धारेवर धरले होते.त्यावेळी अधिकार्‍यांनी शाहूपुरी व शहराच्या उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी  प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही अधिकार्‍यांनी नागरिकांना दिली होती. त्यामुळे नागरिक शांत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शाहूपूरी परिसरात काविळीच्या साथीने नागरिक आजारी असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असलेल्या दुषित पाण्यामुळेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जिल्हा परिषद कॉलनी, धर्मवीर संभाजीनगर व अन्य परिसरातील नागरिकांनी काविळीची साथ झाली आहे. याशिवाय सदरबझार व विसावा नाका येथेही काविळीचे रूग्ण आढळून आले आहेत.याशिवाय विसावा नाका, सदरबझार, उपनगरातील विलासपूर, संभाजीनगर, धनगरवाडी,  गणेश चौक या परिसरातही काविळीचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे आणखी कोठे कोठे हे रूग्ण आहेत याचा शोध आरोग्य यंत्रणेला घ्यावा लागेल. प्राधिकरणाचा दुषित पाणीपुरवठा बंद होवून नागरिकांना आरोग्यदायी व सुरळीत पाणी पुरवठा कधी होईल तेव्हा  होवो. तूर्त तरी कावीळीची साथ फैलावणार  नाही, याबाबत आरोग्य यंत्रणेला उपाययोजना कराव्या लागणार आहेत. प्राधिकरणाने आपल्या कारभारात तातडीने सुधारणा करावी, अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. 

Tags : satara, satara news, Only due, authority, Hepatitis, 


  •