Wed, Jul 24, 2019 06:20होमपेज › Satara › अनधिकृत वीज जोडणी करताना विजेच्या धक्क्याने एकाचा बळी 

अनधिकृत वीज जोडणी करताना विजेच्या धक्क्याने एकाचा बळी 

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 14 2018 11:24PMकुडाळ : प्रतिनिधी

सरताळे (काळेवाडी, ता. जावली) येथे शेती पंपासाठी अनधिकृत वीज जोडणी देताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्‍का बसून हणमंत गंगाराम पोतेकर (वय 40, रा. शेंद्रे) या खासगी कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत  आणखी एक जखमी झाला आहे. दरम्यान, या प्रकाराने महावितरणचा जावली तालुक्यातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

सरताळे (काळेवाडी, ता. जावली) येथे शेती पंपासाठी वीज जोडणी करण्यासाठी शेंद्रे, ता. सातारा येथून राहुल नलावडे, गणेश जाधव, अनिल पडवळ, हणमंत पोतेकर, शरद मोहिते हे आले होते. वीज तारा जोडण्यासाठी हणमंत पोतेकर व शरद मोहिते सिमेंटच्या खांबावर चढले.  दरम्यानच्या काळात मुख्य वीज प्रवाह बंद होता. परंतु अचानक मुख्य वीज प्रवाह सुरु झाल्याने खांबावर काम करत असलेला हणमंत पोतेकर तारेला चिकटला. त्याला सोडवण्यासाठी मोहिते याने प्रयत्न केला परंतु विजेच्या धक्क्याने खांबावरून तोही खाली फेकला गेला. यामध्ये शरद मोहिते याचा हात फ्रॅक्चर झाला.

या बाबत वीजवितरणचे कुडाळचे कनिष्ठ अभियंता अमित नाडगौंडा यांच्याकडे विचारणा केली असता, या वीज जोडणीला अद्याप मान्यता नाही तसेच याबाबत आपणास कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. 

या प्रकरणी महावितरणच्या  दोषी अधिकारी व संबंधित ठेकेदार व कर्मचार्‍यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपस्थित सरताळे ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.