Fri, Jul 19, 2019 20:12होमपेज › Satara › मणदुरेत घर कोसळून एकाचा मृत्यू 

मणदुरेत घर कोसळून एकाचा मृत्यू 

Published On: Apr 18 2018 12:56AM | Last Updated: Apr 17 2018 10:51PMपाटण : प्रतिनिधी

पाटणसह मोरगिरी, ढेबेवाडी, कोयना, तारळे, नवारस्ता, मल्हारपेठ, चाफळ परिसराला मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी विजांच्या कडकडाटांसह वळीव पावसाने झोडपून काढले. वादळीवार्‍यामुळे मणदुरे येथे घर कोसळून दीपक पांडुरंग जाधव (वय 50) यांचा मृत्यू झाला. 

पाटण व अडूळ येथील दोन घरांवरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पावसात वार्‍याचा जोर कमी होता. मात्र पावसापूर्वी काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला आणि त्यानंतर पावसाला सुरूवात झाली.

दरम्यान कोयना धरण परिसरातही दुपारी चारच्या सुमारास पाऊस कोसळला. तासभर धरण परिसराला पावसाने झोडपले. नवारस्ता परिसरात गत आठवड्यात गारांचा पाऊस झाला होता. गेल्या सलग दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या या वळीवाची सुरवात ही गारांनीच होत आहे.त्यामुळे आकाशात ढगांचा गडगडाट सुरु झाला की या परिसरातील  बालगोपाळासह नागरिक गारांच्या प्रतिक्षेत असलेचे दिसत आहेत. जोरदार पडणार्‍या पावसामुळे पाटणसह परिसरातील वीज पुरवठा सायंकाळी उशिरा पर्यंत खंडित होता. त्यामुळे नागरिकांना अंधारात चाचपडत बसावे लागले होते. 

पाटण रामापूर येथे आनंदा किसन चौधरी यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. तर मणदुरे येथे चारच्या सुमारास  जोरदार वादळी वार्‍याने घर कोसळून  दीपक पांडुरंग जाधव यांचा मृत्यू झाला.  सायंकाळी उशिरा पाटण ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

 

Tags : satara, Patan news, Mandure, house collapses, one dies,