Fri, Jan 24, 2020 21:58होमपेज › Satara › मांडूळ तस्करीप्रकरणी एकास अटक

मांडूळ तस्करीप्रकरणी एकास अटक

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:57PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी दुपारी दोन धडाकेबाज कारवाई केल्या. एका कारवाईत पिस्तूल, रिकामी पुंगळी जप्त केली तर दुसर्‍या कारवाईत मांडूळ तस्करीप्रकरणी एकूण तिघांच्या मुसक्या आवळल्या. पिस्तूलप्रकरणी श्रीधर ज्ञानदेव कुंभार (वय 22, रा. धुमाळआळी, गडकरआळी, सातारा), स्वयंभू मेघराज शिंदे (वय 21 रा. परखंदी ता. वाई) व मांडूळ तस्करप्रकरणी अनिकेत आनंदराव निकम (वय 23, रा. हराळी ता. खंडाळा) अशी दोन्ही प्रकरणातील अटक केलेल्यांची नावे आहेत. 

दोन्ही कारवाई आनेवाडी टोलनाका व पाचवड फाटा येथे करण्यात आल्या असून संशयित सातारा जिल्ह्यातील युवक आहेत. दरम्यान, दोन्ही मुद्देमालाची सुमारे 54 लाख रुपये किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, पिस्टलप्रकरणी काही  युवकांची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी एलसीबीच्या पथकाने हॉटेल महाराज, आनेवाडी टोलनाका येथे सापळा रचला. दुपारी दोन युवक दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरत असताना निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांना हटकले. यावेळी ते पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांची झडती घेतली असता एकाकडे घातक शस्त्र आढळले.

दरम्यान, एलसीबीच्या पथकाला पाचवड फाटा येथे एक युवक संशयास्पदरित्या फिरत असल्याचे  आढळून आले.  एलसीबीच्या दुसर्‍या पथकाने संशयिताला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे गोणी आढळून आली. त्या गोणीमध्ये दुर्मिळ जातीचे सुमारे 4 फुटाचे मांडूळ असल्याचे आढळून आले. हा प्रकार मांडूळ तस्करीशी संबंधित असल्याने पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शशिकांत मुसळे, सागर गवसणे, पोलिस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, संजय पवार, ज्योतीराम बर्गे, मोहन नाचण, रविंद्र वाघमारे, योगेश पोळ, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, राहुल कणसे, योगेश कचरे, मारुती अडागळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

54 लाखांचा मुद्देमाल जप्‍त..

एलसीबीच्या पथकाने जप्‍त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 54 लाख रुपये असल्याचे सांगितले. जप्‍त केलेल्या मांडूळाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजार भावाप्रमाणे 50 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच दुसर्‍या प्रकरणातील पिस्तूल, रिकामी पुंगळी, दोन मोबाईल, दुचाकी व रोख रक्‍कम असा एकूण 3 लाख 55 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल आहे. दोन्ही कारवाई भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने गुन्हे त्याचठिकाणी दाखल होणार आहेत.