Fri, May 24, 2019 07:10होमपेज › Satara › खंडणीप्रकरणी एकाला अटक : २ कार जप्‍त

खंडणीप्रकरणी एकाला अटक : २ कार जप्‍त

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 10:54PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील विक्रेत्याचे अपहरण करून त्याला खंडणी मागितल्याप्रकरणी अजमिर अकबर मुल्‍ला (वय 27, रा. नागठाणे, ता. सातारा) याला शहर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोन चारचाकीही जप्‍त केल्या असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

फरजाना मुनीर पट्टणकुडे (रा.गुरुवार पेठ, सातारा) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फरजाना यांचे पती मुनीर यांनी पुणे येथील व्यवसायिकांशी होलसेलमध्ये एलईडी बल्बची एजन्सी घेतली होती. या व्यवहारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली. त्यानुसार एजन्सी, कमिशन ठरले होते. मात्र, असे असतानाही मुनीर पट्टणकुडे याच्याकडे पैसे बाकी राहिले असल्याचे पुणे येथील विकास म्हस्के याचे म्हणणे होते. यातूनच संशयितांनी सातार्‍यातून मुनीर पट्टणकुडे याचे  अपहरण केले व त्याला कारमधून घालून नेले. धमकी देवून पैशांची मागणी करुन त्यांना सोडून देण्यात आले. या घटनेची माहिती मुनीर यांनी पत्नीला दिल्यानंतर त्यानुसार पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचा तपास सुरु असताना अजमिर मुल्‍ला याला शहर पोलिसांनी अटक केली. अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी देण्यात आली. तपासादरम्यान शहर पोलिसांनी याप्रकरणी दोन कारही जप्‍त केल्या आहेत. याप्रकरणी सुमारे पाच ते सात जणांविरुध्द गुन्हा दाखल झालेला असून इतर संशयितांचा शोध सुरु आहे. पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदाल शेखर कडव व सिताराम वाघमळे पुढील तपास करत आहेत.