Mon, Jun 24, 2019 17:36होमपेज › Satara › लग्‍नादिवशीच अपघातात नवरदेवाचा मृत्यू

लग्‍नादिवशीच अपघातात नवरदेवाचा मृत्यू

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 10:41PMकोरेगाव / पळशी : प्रतिनीधी 

लग्‍नाला अवघ्या काही तासांचाच अवधी उरला असताना नवरदेवाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव-सातारा रस्त्यावर जुन्या ल्हासुर्णे फाट्याजवळ बुधवारी सकाळी 6 च्या सुमारास घडली. गणेश विश्‍वासराव बर्गे (वय 31) असे या दुर्दैवी नवरदेवाचे नाव आहे. 

आझाद चौक बाजारपेठ कोरेगाव येथील गणेशचे तांदूळवाडी येथील मुलीशी लग्‍न ठरले होते. बुधवारी कोरेगावच्या शिवरत्न हॉलमध्ये दुपारी  4.45 वाजता या लग्‍नाचा मुहूर्त होता. त्यामुळे  लग्‍नघरी विवाहाच्या दिवशी  धामधूम सुरु होती. रात्री भावकीसह मोठ्या संख्येने उपस्थित असणार्‍या युवा वर्गाने नवरदेव गणेशला घराबाहेर घेत फटाक्यांच्या आतिषबाजीत ग्राम देवतांच्या देवदर्शनासाठी  उत्साहात  वर्धावा काढला होता. घराजवळच असणार्‍या शिवरत्न मंगल कार्यालयात विवाहाची जोरदार लगबगही सुरु होती. बुधवारी सकाळी 10 वाजता सुपारीचा कार्यक्रम होता. त्याची तयारीही पै-पाहुणे व कुटुंबीय करत होते. त्यासाठी पहाटे लवकर उठून प्रत्येकजण कामाला लागले होते. याचदरम्यान गणेश कुटुंबियांना सांगून मॉर्निंग वॉकला म्हणून बाहेर पडला. काही वेळातच अज्ञात वाहनाच्या धडकेत गणेशचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघाताचे  वृत्त कुटुंबियांना समजल्यानंतर एकच कल्लोळ उडाला. लग्न कार्यासाठी आलेल्या सर्व पै-पाहुणे, नातलगांसह त्याच्या मित्रपरिवार व शहरातील युवा वर्गाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दृश्य पाहून कुटुंबिय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या दु:खाला पारावारच उरला नव्हता. काळीज पिळवटून टाकणारा टाहो वातावरण भेदरुन टाकत होता. या घटनेची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

गणेशनेच दिले होते लग्‍नाचे आमंत्रण...

गणेशच्या मृत्यूमुळे बर्गे कुटुंबीय व नातेवाईकही हडबडून गेले आहेत. लग्‍नाला अवघ्या काही तासांचा कालावधी उरला असताना ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. गणेशच्या आठवणींनाही उजाळा दिला जात आहे. मंगळवारी रात्री नवरदेवाला धुमधडाक्यात देवदर्शनासाठी बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर स्वत: गणेशने ‘उद्या लग्‍नाला यायचं बरं का’ असे आग्रहाचे निमंत्रणही दिल्याचे अनेकांनी सांगितले.