होमपेज › Satara › सायकल प्रवासात मी माझाच शोध घेतला

सायकल प्रवासात मी माझाच शोध घेतला

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: Apr 30 2018 11:45PMकराड : प्रतिनिधी

नवनवीन स्वप्न बघण्याची मला लहानपणापासूनच आवड आहे. त्यातूनच मी पनवेल ते कन्याकुमारीपर्यंत सुमारे 1900 किलोमिटरचा प्रवास सायकलवरून करण्याचे स्वप्न पाहिले. त्याला वडीलांचा पाठिंबा व आईचा होकार मिळाल्यामुळेच मी माझे स्वप्न पूर्ण करू शकले. 19 दिवस सायकलवरून प्रवास करताना मी माझाच शोध घेतल्याचे सांगत युवक-युवतींनी सकारात्मक विचार करून स्वत:ला आवडेल ते करावे. त्याला पालकांनीही पाठिंबा द्यावा, असे मत प्रीसिलिया मदन हिने व्यक्‍त केले.कराड रोटरी क्‍लबच्यावतीने आयोजित सत्कारप्रसंगी ती बोलत होती. यावेळी तिने सायकल चालविण्याची आवड, एकटीनेच प्रवास करण्यासाठी मिळालेली प्रेरणा, प्रवासात आलेले अडथळे, समाजाकडून मिळालेली वागणूक यासह विविध प्रश्‍नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. 

प्रीसिलीया म्हणाली, वडिलांना जंगलामध्ये भटकंतीची आवड आहे. घरामध्ये आपले अनुभव सांगत असताना मलाही स्वत:ला असा अनुभव घ्यावा व तो इतरांना सांगता यावा, असे वाटत होते. त्यातूनच माझा सायकल प्रवास सुरु झाला. त्यातून एकदिवस मी वडीलांना पनवेल ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवरून जाण्याचा निर्णय सांगितला. हा निर्णय पूर्णपणे माझा होता. त्याला वडीलांचा पाठींबा व आईचा होकार होता.  पनवेल ते कन्याकुमारीपर्यंत मी सायकलवरून प्रवास करणार असल्याची बाब मित्रांसाठी धक्कादायक होती. मला सायकल चालविण्याची आवड आहे हे मित्रमैत्रिणींना माहित होते. मात्र, असा काहीतरी निर्णय घेईन यावर त्यांचा विश्‍वासच बसत नव्हता. एकटी मुलगी राहणार कोठे, खाणार काय अशा अनेक प्रश्‍नांचा भडीमार पुन्हा सुरु झाला. मात्र, मी नेहमी सकारात्मक विचार करून माझ्या निर्णयावर ठाम राहिले. 

प्रवासाला सुरवात करताना माझ्याबरोबर दोन बॅगा होत्या एक माझी व एक सायकलची म्हणजेच सायकलचा काही बिघाड झाल्यास त्याची दुरूस्ती करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी बरोबर घेतले होते. प्रवासाला निघण्यापुर्वी पंक्‍चर काढणे व इतर दुरूस्तीची कामे मी स्वत: शिकले होते. महाराष्ट्रात भाषेची अडचण आली नाही. मात्र, परराज्यात भाषेची वारंवार अडचण येत असल्याने काहीवेळेस मी खाणाखूणा करून लोकांना सांगत होते.  लोकांना समजून घेता यावे यासाठी मी हॉटेलवर न राहता कोणाच्यातरी घरीच राहिले. प्रवाशाच्या शेवटच्या दिवशी मी सूर्यास्तावेळी कन्याकुमारीत पोहोचले. एवढ्या लांबून एकटीनेच प्रवास करून आल्याचे समजल्यानंतर तेथील लोकांना माझ्यापेक्षाही जास्त आनंद झाला.

एकवेळ तर राहण्याच्या ठिकाणी पोहचण्यास मला वेळ झाला. मी राहणार कोठे याचा विचार करत असतानाच काहीजण भेटले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण राहणार असल्याचे ठिकाण तेथून पाच किलोमिटर दूर असल्याचे समजले. त्यावेळी अंधार पडला होता तरीही मला तेथेपर्यंत सोडण्यासाठी एक युवक तयार झाला. मी धाडस करून त्याच्या पाठीमागून जावू लागले. काही अंतर गेल्यानंतर डांबरी रस्ता संपला व मातीचा रस्ता सुरु झाला. त्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर त्या युवकाने आणखी एक जोडीदार बरोबर घेतला. अडवळणी रस्ता व आजुबाजूला घरेही नव्हती. आपण चुकीच्या तर रस्त्याने जात नाही ना? असा विचार माझ्या मनात आला.  मी वडील व मित्रांना आपले मोबाईलवरून फोनही केला. मात्र, त्यानंतर लगेच स्वत:ला सावरत घडणार्‍या प्रसंगांना आपणाच सामोरे गेले पाहिजे, असा विचार मनात करत असतानाच तो युवक थांबला व  म्हणाला ‘तु राहणार आहेस ते हे घर आहे.’ त्यावेळी मी विचारातून भानावर आले. किती विश्‍वासाने त्या युवकाने मला तेथे आणून सोडले होते. मात्र, मी त्या युवकावर विश्‍वास नाही दाखवू शकले, असेही प्रीसिलीया मदन हिने सांगितले.

Tags : Satara, bicycle, I, searched, myself