Wed, Apr 24, 2019 15:42होमपेज › Satara › नगरपालिकेसाठी पदाधिकार्‍यांचे उपोषण

नगरपालिकेसाठी पदाधिकार्‍यांचे उपोषण

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: Apr 30 2018 11:37PMकराड : प्रतिनिधी

मलकापूर नगरपंचायतीस ‘क’ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळावा याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व नागरीक गुरुवार दि. 3 मे रोजी महात्मा गांधी पुतळ्या समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. यावेळी शहरातील नागरिक व विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

याबाबत मनोहर शिंदे यांनी सांगितले की, मलकापूर  नगरपंचायतीची स्थापना 5 एप्रिल 2008 रोजी झाली असून सध्या या नगरपंचायतीची 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 31 हजार 671 आहे. सध्या शहराची अंदाजे लोकसंख्या 45 हजार इतकी आहे. नियमानुसार नगरपंचायतीची लोकसंख्या 31 हजार 671 असल्याने ‘क’ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळण्याबाबत 5 ऑक्टोबर 2013 रोजी सर्वसाधारण सभेतील ठरावाबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. नगरपंचायतीने वेळोवेळी या प्रस्तावाचा पाठपुरावा करून तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना 25 जून 2014 तसेच नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना 10 डिसेंबर 2015  रोजी विनंती पत्र दिले होते. त्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना 18 डिसेंबर 2017 रोजी नागपूर येथे समक्ष भेटून आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे शिफारस पत्रासह विनंतीपत्र दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सदर पत्रावर कार्यवाही करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार प्रधान सचिवांनी हा प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे 14 मार्च 2018 रोजी पाठविला आहे. मात्र, त्यावर अद्यापपर्यंत स्वाक्षरी झालेली नाही. मलकापूर नगरपंचायतीने दि. 25 जून 2014 रोजी प्रस्ताव सादर करूनही राज्य शासनाने त्या प्रस्तावास मान्यता न देता त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी यांना ‘क’वर्ग नगरपालिकेचा दर्जा दिला असून मलकापूर नगरपंचायतीस वेगळा न्याय का? असा प्रश्‍नही मनोहर शिंदे यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, मलकापूर नगरपंचायतीची मुदत 29 सप्टेंबर 2018 रोजी संपत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूकीची पूर्व तयारी करत 17 सदस्य संख्या निश्‍चित करून त्याप्रमाणे प्रभाग रचना, सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम सुरु ठेवला आहे. नगरपालिका झाल्यास 19 सदस्य संख्या होणार आहे. पण नगरपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत झाले नाही तर 17 च सदस्य निश्‍चित होणार असल्याने दोन सदस्यांना (1 महिला, 1 नामाप्र) पदास मुकावे लागणार आहे. तसेच नगरपरिषदेस विकासासाठी अतिरिक्‍त निधी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना जास्तीतजास्त नागरी सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. राज्य शासन नगरविकास विभागाने मलकापूर ‘क’ वर्ग नगरपरिषद गृहीत धरून कर्मचार्‍यांच्या आकृत्तीबंधास 12 फेब्रुवारी 2018 रोजी मान्यता दिली असल्याने मलकापूर नगरपंचायतीस नगरपलिकेचा दर्जा देणे तांत्रिकदृष्ट्या काहीही अडचणीचे नाही. 

नगरपालिका व्हावी म्हणून नगरपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री, महसूलमंत्री तसेच विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. परंतु, यावर कोणतिही कार्यवाही झालेली नाही. मलकापूर नगरपंचायतीस ‘क’ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर पुर्वीपेक्षा विविध नाविन्यपुर्ण योजना व प्रकल्प हाती घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या वाढीचा विचार करता मलकापूर नगरपंचायतीस ‘क’ वर्ग नगरपालिकेचा दर्जा देण्याबाबत शासन स्तरावरून तात्काळ कार्यवाही होण्यासाठी नगरपंचायतीचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व नागरीक एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.  

 Tags : Satara, Officers, fasting, municipality