Wed, Jul 24, 2019 14:59होमपेज › Satara › कारवायांनंतरही लाचखोरांना पैशाची हाव

कारवायांनंतरही लाचखोरांना पैशाची हाव

Published On: Jun 08 2018 1:24AM | Last Updated: Jun 07 2018 8:19PMसातारा : महेंद्र खंदारे

एखादा सरकारी कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ सापडला की त्याच्यावर रितसर कारवाई होते. जर या लोकसेवकाला शिक्षा झाली तर नोकरीतून काढण्यात येते. त्याला सरकारकडून मिळणारी पेन्शन व ग्रॅच्युईटी रद्द होते. लाच घेतल्यानंतर समाजात मोठी बदनामी होते. लाच घेणार्‍या लोकसेवकांवर वॉच ठेवण्यासाठी व तशी कारवाई करण्यासाठी सरकारने एसीबीसारखी सक्षम यंत्रणा तयार केली आहे. मात्र, पैशासाठी हे अधिकारी खालच्या पातळीवर गेल्याने ‘पुढच्यास ठेस मागचा शहाणा’ ही म्हण फक्‍त बोलण्यापुरतीच झाली आहे. कारवायांचा धडाका सुरू असला तरी लाचखोरांमध्ये पैशाची हाव कमी होताना दिसत नसल्याचे वास्तव आहे. 

महसूल खात्यात तलाठी, सर्कल ते अगदी तहसीलदार पदावरील व्यक्‍ती लाच घेताना सापडल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे पोलिस खाते, सहनिबंधक, शिक्षण संंस्था यांच्यासह शासकीय विभागाच्या सर्वच कार्यालयात लाच मागणार्‍यांची संख्या जास्त आहे. महिनाभरापूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी एका शिक्षकाचे फरकबिल काढण्यासाठी 10 हजार रूपयांची लाच मागितली होती. सांगलीतील जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजेंद्र भाट याने कंत्राटी बेसवरील कर्मचार्‍याचे बिल काढण्यासाठी 10 हजार रूपयांची लाच स्वीकारली होती. 

दोन दिवसांपूर्वी सातारा तालुक्यातील वर्ये येथील मंडल अधिकारी वैभव माळी याला 500 रूपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. याचबरेाबर नेले गावचा ग्रामसेवक राहुल शेळके याने स्मशानभूमीचे बिल काढण्यासाठी 9 हजार 500 रूपयांची लाच मागितली होती. अवघ्या 500 रूपयांसाठी अधिकारी आपला ईमान विकण्यासाठी तयार होत आहे. आपण एका महत्वाच्या पदावर असून लोकांची कामे करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मात्र, हेच काम करताना वरची ‘मलई’ मिळवण्यासाठीच हे अधिकारी व कर्मचारी धडपड करत असल्याचे दिसून आले आहे. यावरूनच लाचखोरीची मुळे किती खोलवर रूजली हे स्पष्ट दिसून येते. 

लाच मागताना आणि घेताना इतका निर्ढावलेपणा सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये कुटून आणि कसा काय आला?  यासाठी एखादी समिती नेमून अभ्यास करायला हवा. इथे लाच घेतली जात नाही, असे छाती ठोकपणे सांगण्यासारखे एकही कार्यालय उरलेले नाही. सरकारी पगार म्हणजेच जनतेच्या खिशातून जाणारा कर असतो. याचाच अर्थ सरकारी विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना जनताच पगार देत असते. गलेलठ्ठ पगाराबरोबरच नोकरीची सुरक्षितता असूनही पुन्हा सर्वसामान्यांचे खिसे मारण्याचे पाप सर्रास सुरू आहेत. सोशल मिडीयातून अशा प्रकारे सर्रास चर्चा होत असल्याने लाच घेण्याची सवय असणार्‍यांचे पितळ एक दिवस उघडे पडतेच.

लोकांमध्ये याबाबतची जन जागृती झाली असून त्यातूनच  जिल्ह्यात एसीबीचे ट्रॅप वाढत आहेत. एसीबीमधील अधिकारी सक्षम असल्याने तक्रारदार बेधडकपणे पुढे येत आहेत. ही सकारात्मक बाब असून नागरिकांनी तक्रारी करणे आवश्यक आहे. दरम्यान, एखादा अधिकारी रंगेहाथ पकडल्यानंतर पुढील कारवाई होईपर्यंत संबधित अधिकारी किंवा कर्मचार्‍याला निलंबित केले जाते. त्यानंतर दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर मालमत्तांची तपासणी केली जाते. त्यानंतर या गुन्ह्यात दोषी आढळल्यांतर 1 ते 10 वर्षापर्यंत शिक्षा लागू शकते. एवढ्या सगळ्या गोष्टी असतानाही लाच घेणार्‍यांचा आलेख हा चढताच राहिला आहे.ही फार मोठी दुर्देवाची गोष्ट आहे.

लाचेचे पैसे मुरतात तरी कुठे?

अनेक कार्यालयांमध्ये लाच घेतल्याशिवाय काम केले जात नाही. यामुळे बहुसंख्य जण अशा कार्यालयातील संबंधितांना लाच देतात. त्यामुळे साहजिकच दररोज हजारो आणि लाखो रूपये गोळा होत असते. म्हणजे मोक्याच्या ठिकाणी काम करणारे दोन-चार लाख रूपये रोज घरी घेऊन जात असणार. पण हे पैसे नेमके कुठे मुरवले जातात. हे पैसे गोळा करणारे नेमके कोण दलाल आहेत. याची माहिती संबधितांच्या कॉल डिटेल्सवरून सहज मिळते.तसेच सर्वच कार्यालयात सीसीटीव्ही असल्याने या परिसरात कोणाची उठबस असते. याचेही पुरावे सहज मिळतात. आता एसीबी  कॉल डिटेल्सवरून संबंधित दलाल आणि लाचेसाठी मध्यस्थी करणार्‍यांवरही कडक कारवाई केली तरच ही भ्रष्टाचाराची गंगा कमी होईल. किमान हे पैसे कुठे आणि कसे मुरवले जातात हेही लोकांसमोर येऊ शकेल.