होमपेज › Satara › पोलिसांच्या अंगावर सोडले कुत्रे

पोलिसांच्या अंगावर सोडले कुत्रे

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 11:05PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सदरबझार येथील आमनेवाडाच्या पाठीमागे घरालगत सुमारे दीड किलो वजनाचे गांजाचे झाड जप्‍त करत असताना संशयित महिलेने पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका पोलिसाला कुत्र्याने चावा घेतला. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

वसीम इलियास शेख (वय 27)व शहजादी शेख (दोघे रा.सदरबझार) असे संशयित पती-पत्नीचे नाव आहे. पोलिस हवालदार किशोर तारळकर असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. दरम्यान, पोलिस हवालदार राहुल खाडे यांनी याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझार येथे गांजाचे झाड असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. या घटनेनंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी आमनेवाडा पाठीमागे गांजाचे झाड निदर्शनास आले. वसीम शेख याच्या घरालगत असणार्‍या गांजाच्या या  झाडाला पाणी, खत घातले असून ते पडू नये यासाठी वायरीने बांधलेलेही होते. यावरुनच हे झाड जगवल्याचे पोलिसांची खात्री झाली.

पोलिसांची चाहुल लागताच संशयित वसीम याने घटनास्थळावरुन पळ काढला. वसीमची पत्नी शहजादी घटनास्थळी होती. गांजाच्या झाडाबाबत माहिती विचारल्यानंतर त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करत असताना त्या महिलेने पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले. त्याचवेळी तारळकर या पोलिसाला कुत्र्याने चावा घेतला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर गांजाचे झाड जप्‍त केले.

दरम्यान, जखमी पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत पोनि नारायण सारंगकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बेकायदा गांजाचे झाड लावणे, ते जगवणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. जप्‍त केलेल्या झाडाची किंमत  10 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोनि नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस हवालदार राहुल खाडे, अनिल पवार, दीपक झोपळे, किशोर तारळकर, शिवाजी भिसे, संजय भोईटे यांनी कारवाईत सहभाग घेतला.