Thu, Aug 22, 2019 03:59होमपेज › Satara › घरपोच लग्‍नपत्रिकेमुळे येवू लागलेय विघ्न

घरपोच लग्‍नपत्रिकेमुळे येवू लागलेय विघ्न

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 15 2018 8:14PMसातारा : मीना शिंदे 

विवाह सोहळ्याच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी कार्यमालकाला भिरकीट करावी लागत असून वेळप्रसंगी अपघाताचे गालबोट लागत आहे. ही दमछाक थांबवण्यासाठी पोस्ट खाते, कुरियर, मोबाईल, ई-मेल, वॉटस्अ‍ॅप, फेसबुकसारखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतानाही घरी जावून पत्रिका  देण्याकडेच आजही कल आहे. मात्र, अलिकडे लग्‍नपत्रिका वाटताना झालेल्या काही दुर्घटनांमुळे लग्‍न घरी मंगल सूर कानी पडण्याऐवजी आक्रोशच वाट्याला येत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. 

सध्या अधिक मासामुळे लग्‍न सराईला ब्रेक लागला असला तरी काढीव तिथी व जून, जुलैमधील लग्‍न तारखा अजूनही बाकी आहेत. लग्‍न म्हणजे या कुटुंबासाठी आनंदाचा ठेवा असतो. लग्‍न घटिकेच्या मंगलसमयी पै पाहुण्यांसाठी आप्तेष्ट,  मित्र परिवार, सारा गोतावळा यांची उपस्थिती लाख मोलाची असते. त्यामुळे या सर्वांना लग्‍नाचे निमंत्रण आग्रहाने देणे स्वभाविकच आले. त्यासाठी लग्‍नपत्रिकांचा थाट असतो. लग्‍नपत्रिका ही प्रक्रिया म्हणजे विवाह सोहळ्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असतो. लग्‍नपत्रिका तयार करणे, कुटुंबातील, वाड्यातील कुणाचे नाव राहू नये यासाठी काळजी घेणे, सख्खे चुलत, मामा-मामी, मित्र परिवार यांची नावे आवर्जुन टाकणे, पत्रिकांची छपाई,  त्यानंतर पत्रिकांवर नावे टाकणे, त्याचे वाटप करणे यासाठी बरीच यंत्रणा काम करत असते. मात्र, या लग्‍नपत्रिका वाटपाला अलिकडे दुर्घटनांनी ग्रासले आहे. 

जवळच्या, लांबच्या सर्व पै-पाहुण्यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यासाठी कार्यमालकाच्या पायाला भिंगरी बांधलेली असते. प्रत्येक नातेवाईकांना समक्ष जाऊन लग्नपत्रिका देत आग्रहाचे निमंत्रण देण्यावर कार्यमालकाचा भर असतो. वेळप्रसंगी कुटुंबातील सदस्य व भाऊंबदकीचे दावेदारही लग्नपत्रिका पोहचवण्यासाठी गावोगाव पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत असतात. लवकर पोहचून जास्तीजास्त पत्रिका वाटता याव्यात यासाठी सर्वच स्पीड घेतात.  मात्र, या घाईगडबडीत बर्‍याचदा अपघाताचे गालबोट लागल्याने सुखाच्या रेशीमगाठींवर दु:खाचे सावट येवू लागले आहे.

लग्न म्हणजे आनंद सोहळा असतो.  एका डोळ्यात आसू आणि दुसर्‍यात हासू असाच हा सोहळा असतो. आनंद आणि उत्साहाला भरते आलेले असते.  या उत्साहातच लग्न पत्रिका वाटण्याची घाईगडबड सुरू असते. या धावपळीत दुर्घटना घडू लागल्या असून प्रत्यक्षात वरासह वर पिता, कुटुंबातील अन्य सदस्य, मित्र यांच्या जीवावर या दुर्घटना बेतू लागल्या आहेत. त्यामुळे मंगल वातावरण अमंगल होवू लागले आहे. पण खरंच सांगा  सोशल मिडीया, संदेश साधने असताना असे भीरकीट करुन लग्न पत्रिकेव्दारे निमंत्रण देण्याची गरज आहे का? ही खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

नातलग नाराज होतील... ही भावना दूर ठेवा...

आधुनिक जीवनशैलीत  लग्नपत्रिका वाटण्यासाठी पोस्ट खाते, कुरियर, मोबाईल, ई-मेल, वॉटस्अ‍ॅप, फेसबुकसारखी  अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असताना घरोघरी जावून पत्रिका वाटणे  बंद झाले पाहिजे, असा सूर उमटत आहे.  अशा पत्रिका वाटताना  दमछाक होते. वेळ,  पैसा आणि प्रसंगी अपघातामध्ये जीवही गमवावा लागतोय. धकाधकीच्या युगात पत्रिका वाटणे या गोष्टीला इतके अवास्तव महत्त्व का दिले जातेय. दुचाकी, चारचाकी घेवून पत्रिका वाटताना दिवसभरात  जास्तीत जास्त 10 ते 15 ठिकाणी पत्रिका वाटता येतात. ते आपल्याकडे स्वत: पत्रिका घेवून आले होते, मग आपणही गेले पाहिजे नाहीतर नातलग नाराज होतील, लग्नाला येणार नाहीत अशी भावना दूर झाली पाहिजे.  घरी पत्रिका द्यायचा आग्रह  आता तरी धरु नये. असा सूर आहे.