Sun, Nov 17, 2019 13:41होमपेज › Satara › आता वरचा रस्ता दुहेरी, खालचा रस्ता एकेरी

आता वरचा रस्ता दुहेरी, खालचा रस्ता एकेरी

Published On: Jul 12 2019 1:59AM | Last Updated: Jul 11 2019 10:54PM
सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात एकेरी वाहतुकीचा पोलिसांनी निर्णय घेऊन एक महिना होत असतानाच त्यामध्ये मोठा बदल करण्यात आला. आता मोती चौक ते पोलिस मुख्यालय हा कर्मवीर भाऊराव पथ (खालचा रस्ता) एकेरीच राहणार असून राजपथ मार्ग (वरचा रस्ता) हा दुहेरीसाठी खुला राहणार असल्याचा निर्णय पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घेतला. दरम्यान, सातारकरांनी एकेरीला विरोध केल्यानंतर पोलिसांनी त्याबाबत फिफ्टी फिफ्टीचा निर्णय घेतला. सध्या पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. यामुळे सातार्‍यातील एकेरी वाहतुकीला बे्रक लागला होता. गेली सहा महिने एकेरीला बे्रक लागल्यानंतर पोवई नाक्यावरील वाहतूक कोलमडली; पण त्याच बरोबर मोती चौक, खण आळी, खालचा रस्ता, वरचा रस्ता याठिकाणी वाहतुकीचा बट्ट्याबोळ उडाला. 

ग्रेड सेपरेटरचे काम होईपर्यंत एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी होणार नसल्याचे गृहित सातारकरांनी बांधले असतानाच पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जून महिन्यात पुन्हा एकेरी सुरु करण्याचा आदेश दिला. वाहतूक विभागाने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. दूरदृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एकेरी वाहतुकीबरोबरच शहरात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशास बंदी घातली. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही व सातारकरांचे कसरत टाळली जावी, हा त्यामागील उद्देश होता. एकेरी वाहतुकीचा निर्णय होवून एक महिना पूर्ण होत असतानाच व्यापारी वर्गाने लोकप्रतिनिधींकडे धाव घेवून साहित्य खाली करण्यासाठी येणारे ट्रकना दिवसा प्रवेश मिळावा, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली. व्यापार्‍यांचे हित पाहून पोलिस अधीक्षकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत अवजड वाहनांना मुभा दिली. मात्र याच बैठकीत रस्त्यांची आबाळ, अतिक्रमाणांचा विळखा त्यातच एकेरी यामुळे गोंधळ उडत असल्याचे सांगून एकेरी वाहतुकीलाही विरोध दर्शवण्यात आला.

अवजड वाहनांना दिवसा चार तासाची बंदी उठवल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवारी पोलिस अधीक्षकांनी त्यांच्या कार्यालयात बैठक बोलवली व त्यामध्ये वाहतुकीबाबत निर्णय घेण्यात आले. या बैठकीतील महत्वपूर्ण म्हणजे वरचा रस्ता दुहेरी करण्यात आला. त्याचबरोबरच खालचा रस्ता मात्र एकेरीच राहिल हे स्पष्ट करण्यात आले. यामुळे मोती चौकातून पोवई नाक्याकडे जायचे झाल्यास राजपथ व मोती चौकातून खालच्या रस्त्याने जाता येणार आहे. मात्र पोवई नाक्यावरुन मोती चौकाकडे जायचे झाल्यास केवळ राजपथावरुन जावे लागणार आहेे. त्यासाठी पोलिस मुख्यालयासमोरुन शेटे चौकमार्गे जाता येणार नाही.

तसेच या बैठकीमध्ये सातारा नगर पालिकेला अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. कर्मवीर पथावर पालिकेने हॉकर्स झोन मार्क करुन घेणे. पार्कींगसाठी बोर्ड लावून ठरावीक जागा तयार कराव्यात. दुकानदारांनी त्यांच्या दुकानात ग्राहकांना ये-जा करण्यासाठी पट्टे आखून किंवा रॅम्प बनवून द्यावेत. वाहतूक शाखेकडून पार्कींगच्या जागेत ठेवण्यात येणार्‍या लोखंडी जाळ्या, दुकानाचे बोर्ड यावर कारवाई करावी. पालिकेने कर्मवीर पथ, राजपथ तसेच शहरातील इतर ठिकाणचे अतिक्रमण काढावीत. विशेष करुन पोवई नाका, मोती चौक, गोलबाग येथील अतिक्रमणे काढून त्याठिकाणी चारचाकी, दुचाकीचे पार्कींग, हॉकर्स झोन तयार करणे. पालिकेने दररोज अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करावी. पावसाळ्यात पडलेले खड्डे पालिकेने त्वरित बुजवावेत. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे पोवई नाका ते भूविकास बँक रस्त्याच्या दुहेरी बाजूकडील फुटपाथावरील अतिक्रमण काढावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

पोलिस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत सपोनि सुरेश घाडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता राहूल अहिरे, पालिकेचे सुधीर चव्हाण, प्रशांत निकम, वाहतूक संघटनेचे प्रकाश गवळी, व्यापारी, नागरिक उपस्थित होते.

आजच्या बैठकीत काय होणार...?

सातार्‍यातील वाहतूकसंबंधी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. यावेळी वाहतूकसंबंधी जिल्हाधिकार्‍यांना पोलिसअहवाल सादर करणार आहेत. यामुळे या अहवालात आणखी काय आहे? याबाबत उत्सुकता कायम आहेे.