Tue, Aug 20, 2019 04:08होमपेज › Satara › पोलिसांकडून वाहनचालकांना नोटिसा

पोलिसांकडून वाहनचालकांना नोटिसा

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 12:10AMकराड : प्रतिनिधी 

येथील आरटीओ कार्यालयातील बनावट पावत्यांसह आठ गायब पुस्तकांप्रकरणी सहा ते सात संशयितांची नावे चौकशीतून समोर आली आहेत. विशेष म्हणजे हे सर्व संशयित एजंट असून कोणाच्या वरदहस्तामुळे हा लाखो रूपयांचा काळाबाजार करण्यात आला? याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी 80 हून अधिक वाहनचालकांना नोटिसा काढल्या असून त्यांच्याकडूनही पोलिस माहिती घेणार आहेत.

तीन दिवसांपूर्वी कराडच्या आरटीओ कार्यालयातील बनावट पावती पुस्तकांसह आठ गायब पावती पुस्तकांची तक्रार कराड शहर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात सुमारे सहा ते सात संशयित एजटांचा सहभाग असल्याचे बुधवार सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले होते. ज्या संशयितांचा सहभाग आहे, अशा संशयितांपैकी काही जणांकडे चौकशी सुरू आहे. मात्र काही संशयितांनी पोबारा केला असून पोलिस त्यांच्या पाळतीवर आहेत. 

तसेच बुधवारीही काही ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून संशयितांचा शोध घेतला. ज्या संशयितांनी पलायन केले आहे, त्या संशयितांच्या शोधासाठी पोलिसांकडून विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. त्याचबरोबर गुन्ह्याशी संबंधित माहिती घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक आरटीओ कार्यालयातही गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, 80 हून अधिक वाहन चालकांनी भरलेल्या कराची पूर्ण रक्कम बँकेंत भरणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्व वाहन धारकांकडून माहिती घेण्यासाठी पोलिसांनी संबंधितांना नोटिसा काढल्या आहेत. नोटिसा प्राप्‍त झाल्यानंतर संबंधित वाहन चालकांनी पोलिस ठाण्यात माहिती देण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी केले आहे.