Tue, May 21, 2019 22:34होमपेज › Satara › उत्तर कोरेगावकरांचा दुष्काळमुक्‍तीचा नारा

उत्तर कोरेगावकरांचा दुष्काळमुक्‍तीचा नारा

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 18 2018 10:22PMपिंपोडे बुद्रुक : कमलाकर खराडे

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील प्रमूख बाजारपेठा व राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावे म्हणून पिंपोडे बुद्रुक व वाठार स्टेशन या गावांची ओळख आहे. तशीच पिढ्यानपिढ्या कायम दुष्काळी म्हणूनही उत्तर कोरेगावमधील गावे ओळखली जातात. आता मात्र आपल्या भागाला लागलेला हा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी गावकरी एकवटले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून उत्तर कोरेगाव तालुक्यातील अनेक गावे दरवर्षी डिसेंबर महिन्यापासूनच प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करतात, हा आजवरचा अनुभव आहे. मात्र गेल्या तीन-चार वर्षात या दुष्काळी गावांमधील ग्रामस्थांना पाणी बचतीचे महत्व पटू लागले आहे. डोंगराकडेला असणार्‍या वाड्या-वस्त्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण होवू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जर छोटी-छोटी गावं स्वयंपूर्ण होत असतील तर आपणही हे काम करू शकतो, या वेडाने काही मोठ्या गावातील युवक मंडळी या जलसंधारण कामात पुढाकार घेऊ लागली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बिचुकले व अनपटवाडी या गावांनी लोकसहभागातून गेल्या दोन वर्षात जलसंधारणाचे मोठे काम केले. आज भर उन्हाळ्यातही त्या गावातील भूजल पातळी टिकून आहे. त्यामुळे त्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत नाही. ही त्या गावांसाठी आनंदाची बाब आहे.

सोळशीपासून कोरेगावपर्यंत वाहणार्‍या वसना नदीचे शासनाने पुनरुज्जीवन करत नदीवर 27  बंधारे बांधून नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केले. दरवर्षी डिसेंबर महिन्यातच कोरड्या पडणार्‍या नदीवर आजही बंधार्‍यात पाणी आहे, हे जलयूक्त कामाचे यश बघून आणि गत दोन वर्षात इतर गावांनी केलेली कामं बघून यावर्षी या पाच गावांतही आता पाणी टंचाई हद्दपार झाली आहे.

नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्या- मुंबईला स्थायिक झालेले तरुण आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी झटू लागले आहेत. त्यामुळे सर्वच गावात पहाटेपासूनच लगबग सुरू होत आहे. या सर्व गावातील तरुण, महिला, मुलं, जेष्ठ नागरिक आपापसातील भेदभाव विसरून गावाला पाणीदार करण्यासाठी धडपडत आहेत. जुन्या बंधार्‍यांचे खोलीकरण, रुंदीकरण, कामे चालू आहेत. सीसीटी, डीप सीसीटी, दगड माती नालाबांध, ओढ्यावर छोटे माती बंधारे, शेततळी, प्रत्येक घरी शोषखड्डा अशा कामांनी गती घेतली आहे. अनेक गावातील राजकीय गट हेवेदावे विसरून पाण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन जर इतर गावे पुढे आली तर भविष्यात उत्तर कोरेगाव तालुक्याचाच दुष्काळी भाग हा कलंक पुसण्यासाठी वेळ लागणार नाही.