Sun, Jul 21, 2019 10:24होमपेज › Satara › पोवईनाक्यावर जड वाहनांना नो एंट्री 

पोवईनाक्यावर जड वाहनांना नो एंट्री 

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 10:31PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातील पोवईनाका येथे उड्डाणपूलाचे (ग्रेड सेपरेटर) बांधकामाची सुरुवात दि. 15 मार्च 2018 पासून झालेली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी एस. टी. बसेस, अवजड वाहनांना तसेच इतर सर्व प्रकारच्या वाहनांस हा रस्ता बंद होणे आवश्यक असल्याने पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी  मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि. 13 एप्रिल 2018 पासून पुढील आदेश होई पर्यंत या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे सातारा शहरातील मोती चौक ते शाहू चौक तसेच मोती चौक ते पोलीस मुख्यालय मार्गे पोवईनाका एकेरी वाहतूक व्यवस्था पुढील आदेशापर्यंत शिथिल करण्यात येत आहे.

बसेस व अवजड वाहनांना दैनंदिन वाहतुकीस पर्यायी असणारा मार्ग पुढीलप्रमाणे. एस. टी. स्टॅण्ड परिसरातून कोल्हापूर-रहिमतपूर-सांगली-कोरेगाव-विटाकडे जाणार्‍या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने बस स्टॅन्ड भुविकास बँक-जुना आर. टी. ओ. चौक -वाढे फाटा मार्गे जातील.एस. टी. स्टॅन्ड परिसरातून कोल्हापूर-रहिमतपूर-सांगली-कोरेगाव -विटाकडे जाणार्‍या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने बस स्टॅन्ड-पारंगे चौक-सिव्हिल हॉस्पिटल-मुथा चौक-बांधकाम भवन-बॉम्बे रेस्टॉरंट मार्गे जातील.

एस.टी.स्टॅन्ड परिसरातून बोगद्यामार्गे तसेच कासकडे जाणार्‍या एस.टी. बसेस, जड अवजड वाहने राधिका सिग्नल-राधिका रोड मार्गे राधिका टॉकिज-मोतीचौक-चांदणी चौक-समर्थ मंदिर मार्गे जातील.

शहरात प्रवेश करण्यासाठीचा मार्ग पुढीलप्रमाणे राहील. कोल्हापूर-रहिमतपूर-सांगली-कोरेगाव-विटा बाजूकडून येणार्‍या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने शिवराज फाटा-अजंठा चौक-बॉम्बे रेस्टॉरंट मार्गे न येता खेड फाटा - सैनिक नगर - सदर बझार - सेंट थॉमस एलफिस्टन चर्च- रिमांडहोम- जुना आर. टी. ओ. चौक मार्गे बस स्टॅन्ड परिसराकडे येतील. बोगद्याकडून तसेच कास बाजूकडून येणार्‍या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने समर्थ मंदिर-मोती चौक-पोलीस मुख्यालय-प्रिया व्हरायटीज-हॉटेल मनाली कॉर्नरमार्गे बस स्टॅन्ड परिसराकडे येतील.

बोगद्याकडून तसेच कास बाजूकडून येणार्‍या एस. टी. बसेस, जड अवजड वाहने शाहू चौक-अलंकार हॉल कॉर्नर-आर. के. बॅटरी-पोलीस मुख्यालय-प्रिया व्हरायटीज-हॉटेल मनाली कॉर्नर मार्गे बस स्टॅन्ड परिसराकडे येतील. एस.टी.स्टॅन्डकडून पोवईनाका मार्गे जाणार्‍या  वाहनांकरीता काँग्रेस भवन ते पोवई नाका हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद करण्यात येत आहे. यासाठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे राहील. काँग्रेस भवन ते प्रिया व्हरायटी-आर. के. बॅटरी कॉर्नर. बस स्टॅन्ड ते पारंगे चौक - मुथा चौक- बांधकाम भवन. राधिका सिग्नल-राधिका रोड-राधिका टॉकीज चौक मार्ग पर्यायी म्हणून उपलब्ध आहेत.

पार्किंग व नो पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे राहील. हॉटेल मिलन ते हॉटेल मोनार्क (मरीआई कॉम्प्लेक्स साताराच्या पाठीमागे) या जाणार्‍या रोडवर हॉटेल महाराजाच्या  पाठीमागील गेट ते हॉटेल गुलबहारचे पाठीमागील गेट पर्यंत रोडच्या उजव्या बाजूस वाहने पार्क करावीत. पार्किंग दिलेला मार्ग सोडून या मार्गावर इतरत्र कोठेही वाहने पार्किंग करु नयेत. या मार्गावरील पूर्वीची सम-विषम पार्किंग व्यवस्था स्थगित करण्यात येत आहे.सर्व नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.

शिवतीर्थावरील भिंत हटवण्यास विरोध

पोवई नाका शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारील भिंत पाडण्यास धर्मवीर युवा मंचने विरोध दर्शवला असून त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना देण्यात आले आहे. राजधानी सातार्‍यातील पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेप्रेटरच्या कामात शिवतीर्थची पोस्टाकडील बाजू 3 मीटरने आत घेण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यास जिल्हा परिषद अध्यक्षांनी परवानगीही दिली आहे. मात्र, विकासकामास खो घालण्यात रस नाही. परंतु, पोस्टाकडील बाजूस 3 मीटर बाजू पलीकडे सरकण्यास काहीच हरकत नाही. काही धनदांडग्यांच्या पुढे अतिक्रमण काढण्यास जमत नाही. त्यामुळेच बांधकाम विभागाकडून संबधित भिंत हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. या निर्णयाने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जातील. त्या आधीच आपण पर्यायी मार्ग अवलंबवावा अन्यथा उद्भवणार्‍या परिस्थतीस प्रशासन जबाबदार राहिल, असा इशारा धर्मवीर  युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत नलवडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

Tags : satara, satara news, Powai naka, heavy vehicles, No entry,