Wed, Mar 20, 2019 23:04



होमपेज › Satara › नितीन बानुगडे-पाटील कृष्णा खोर्‍याचे उपाध्यक्ष

नितीन बानुगडे-पाटील कृष्णा खोर्‍याचे उपाध्यक्ष

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 11:04PM



सातारा : प्रतिनिधी

संभाव्य लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने महामंडळांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. जिल्ह्यातून भाजपच्या वाटेवर असलेले माजी आमदार नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली आहे. तर, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेना-भाजपने जोरदार खेळी केली आहे. एनकुळ (ता. खटाव) चे सदाशिव खाडे यांची पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदावर निवड झाली आहे. 

माजी आमदार नरेंद्र पाटील हे गेले वर्षभर भाजपच्या संपर्कात होते. विशेषत: मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक वाढली होती. राज्यात मराठा मोर्चाचे वातावरण तापले असतानाच नरेंद्र पाटील यांना भाजपच्या कोट्यातून अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. दुसरीकडे शिवसेनेही सातारा जिल्ह्याला पद दिले असून शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. 

नरेंद्र पाटील हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडीचे आहेत. त्यांना महामंडळावर घेवून सातारा जिल्ह्यातील भाजप बळकट करण्याचा व मराठा मोर्चामुळे निर्माण झालेले भाजपविरोधी वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केला  जाणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने मात्र प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचा सन्मान केला असून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी असलेली जवळीक बानुगडे-पाटील यांच्या पथ्यावर पडली आहे. वास्तविक सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही शिवसेनेकडेही आहे. आता कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदही शिवसेनेला मिळाले आहे. मात्र, प्रत्यक्षात शिवसेना किती वाढणार? याविषयी उत्सुकता आहे.