होमपेज › Satara › विडणीजवळ निरा उजवा कालव्याला गळती

विडणीजवळ निरा उजवा कालव्याला गळती

Published On: Apr 26 2018 2:04AM | Last Updated: Apr 25 2018 9:07PMविडणी : वार्ताहर

विडणी ता. फलटण येथे निरा- उजवा कालव्याला 25 फाटा येथे गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असून मोठी दुर्घटना होेण्याची शक्यता निर्माण झाल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

निरा- उजवा कालवा हा विडणी मधून वाहत जातो. याठिकाणी या कालव्याचा 25 नंबरचा फाटा आहे. या फाट्याचे बांधकामही इंग्रजांच्या काळातीलच असून सध्या फाटयाचा पुल व पुलाजवळील भरावही खचला आहे. फाटयाच्या पुलालगतच मोठी गळती लागली आहे व या ठिकाणीच धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

निरा- उजवा कालवा हा पूर्ण क्षमतेने तुडूंब भरुन वाहत असतो यामुळे कालव्याला अनेक ठिकाणी लहान मोठी गळती चालूच असते. मात्र संबंधित पाटबंधारे खाते नेहमीच याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळेच विडणी परिसरातच यापूर्वीही सहामोरी येथे हा कालवा फुटून मोठी दुर्घटना घडली होती. 

आता 25 फाटा येथे लागलेली गळती ही फाट्याच्या तोंडाच्या शेजारीच असल्याने व या गळतीचे पाणी हे फाट्यातच जात असल्याने याकडे लोकांचे लक्ष जात नाही. ही गळती मोठ्या स्वरुपाची असल्याने तसेच याच ठिकाणचा फाट्याचा पूल व भरावही पूर्णपणे खचला गेला असून याठिकाणी केव्हाही दुर्घटना घडू शकते.  या फाटयालगतच  अनेक लोकवस्त्या असल्याने येथील लोकांच्याही जिवीतास धोका निर्माण झाला आहे. 

या ठिकाणची गळती ही बर्‍याच वर्षापासून सुरु आहे. या गळती संदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा संबंधित खात्यास कळवले आहे. परंतु, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत  आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची वेळ अधिकारी वाट पाहत आहे काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

 

Tags : satara, Vidani news,  Nira Right canal, leak,