Tue, Jun 02, 2020 02:03
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › कराड दक्षिणच्या राजकारणात नवा ट्विस्ट

कराड दक्षिणच्या राजकारणात नवा ट्विस्ट

Published On: Sep 10 2019 3:19PM | Last Updated: Sep 10 2019 3:19PM

आमदार पृथ्वीराज चव्हाणकराड : प्रतिनिधी

खा. श्री. छ. उदयनराजे समर्थकांनी रविवारी मेळावा घेत नामोल्लेख टाळत माजी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड नगरपालिका निवडणुकीनंतरच्या भूमिकेवर टीका केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत कराड शहरातील मताधिक्य निर्णायक ठरले होते. लोकसभा निवडणुकीनंतर खासदार समर्थक काँग्रेससोबत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र या अपेक्षांना धक्का लागला असून खासदार समर्थकांच्या भूमिकेमुळे कराड दक्षिणच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

2014 मधील विधानसभा निवडणुकीत खासदार समर्थक राजेंद्रसिंह यादव यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली होती. यादव यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. यावरूनच राजेंद्रसिंह यादव गटाच्या ताकदीचा अंदाज येतो. राजेंद्रसिंह यादव यांनी निवडणुकीतून काही कारणाने माघार घेत थेट आ. पृथ्वीराज चव्हाण यांना ताकद दिली होती. 

मुख्यमंत्री पदाचे वलय आणि राजेंद्रसिंह यादव गटाची साथ यामुळे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कराड व मलकापूर या दोन शहरात आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्यच निर्णायक ठरले होते. नगरपालिका निवडणुकीतही जिकडे यादव गट तिकडे गुलाल हे समीकरणच पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते. मात्र त्यानंतर 2016 साली झालेल्या कराड नगरपालिका निवडणूक निकालानंतर नाट्यमय घडामोडी होऊन राजेंद्रसिंह यादव गट आ. पृथ्वीराज चव्हाण गटापासून दूर गेला आहे. सध्यस्थितीत यादव गटामुळे सुमारे 25 हजारांचा फरक पडू शकतो. त्यामुळेच राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितल्याप्रमाणे यादव समर्थक निश्‍चितपणे एखाद्या उमेदवाराचे बारा वाजवू शकतात, अशीच सध्यस्थिती आहे.

गेल्या 15 दिवसांपासून कराडमध्ये खासदार समर्थकांच्या भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. रविवारी ‘आमचा केवळ वापर करून घेतला’ असा दावा करत खासदार समर्थकांनी नामोल्लेख टाळत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेविरूद्ध रोष व्यक्त केला. तसेच ज्यांना आमची मदत हवी आहे, त्यांनी यापूर्वी आमच्याबाबत काय केले ? हे पहावे, असा इशारा देत यादव समर्थक कोणताही निर्णय घेऊ शकतात याचे सूतोवाच राजेंद्रसिंह यादव यांनी केले आहे.

त्यामुळेच सध्यस्थिती पाहता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात खासदार समर्थक राजेंद्रसिंह यादव गट आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठिशी राहणार नाही,  अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांचाच निर्णय अंतिम राहणार असल्याने आता ते कोणती भूमिका घेणार ? याकडे कराड दक्षिणसह संपूर्ण जिल्ह्याचे लागून राहिले आहे. एकूणच खासदार उदयनराजे भोसले समर्थक कराड दक्षिणमध्ये निर्णायक भूमिका बजावू शकतात आणि त्यामुळेच आता कराड दक्षिणच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

नगरपालिकेतच आ. पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराड नगरपालिका निवडणकीत 17 नगरसेवक विजयी झाले होते. मात्र निकालानंतर आठवडाभरात 1 अपक्षाला सोबत घेत 15 नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतली होती. तर महिला बालकल्याण सभापती स्मिता हुलवान आणि राजेंद्र माने दोनच नगरसेवकांनी आ. पृथ्वीराज चव्हाण गटासोबत राहणे पसंत केले होते. त्यापैकी स्मिता हुलवान यांनी रविवारी राजेंद्रसिंह यादव गटासोबत आपण असल्याचे सांगितल्याने कराड नगरपालिका राजकारणात आ. पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का बसला आहे.