Wed, Jul 24, 2019 12:51होमपेज › Satara › नवीन दुचाकी किलोच्या भावात

नवीन दुचाकी किलोच्या भावात

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 10:26PMवाई : प्रतिनिधी

वाई शहरामध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. चोरीस गेलेल्या दुचाकी चक्‍क किलोच्या भावाने विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दुचाकी चोरीचे रॅकेट वाईमध्ये कार्यरत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.  याप्रकरणी पोलिसांनी एक चोरीची दुचाकी पकडल्यानंतर किलोमध्ये दुचाकी विकत घेतल्याचे संबधित व्यक्‍तिने सांगितले आहे.  

काही दिवसांपासून वाई शहर व परिसरात दुचाकी चोर्‍यांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये दुचाकी चोरट्यांचे रॅकेट असून चोरी केलेली दुचाकी किलोच्या भावामध्ये विकली जात आहे. काही दिवसांपूर्वी गणपती घाट येथून माजी नगराध्यक्ष जनार्दन वैराट यांची दुचाकी चोरीस गेली होती. हीच दुचाकी एक व्यक्‍ति चालवत असल्याचे निदर्शनास आले. गाडीचा रंग बदलण्यात आला होता. तर नंबरप्लेटही काढण्यात आली होती. या चालकाला ताब्यात घेतल्यानंतर ही नवीन दुचाकी किलोच्या भावामध्ये अवघ्या 1 हजार 500 रूपयांना विकत घेतल्याचे सांगितले. 

गाडीची कागदपत्रे व स्मार्टकार्ड न देताच या गाड्यांचा व्यवहार होत आहे. तर स्वस्त गाडी मिळत असल्याने या दुचाकींचा भाव चांगलाच वधारला आहे. चोरीचा गाडीचा रंग बदलून विना नबर प्लेट या गाड्या वापरल्या जात आहेत. या घटनेवरून शहरामध्ये दुचाकी चोरीचे रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून आता दुचाकी चोरांना पकडण्यासाठी सापळा तयार करण्यात येत आहे. याबाबत वाई पोलिसांमध्ये वैराट यांनी गुन्हा दाखल केला आहे.