Tue, Mar 19, 2019 15:31होमपेज › Satara › न्यू फलटण शुगरला जप्तीची नोटीस 

न्यू फलटण शुगरला जप्तीची नोटीस 

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 10:48PMफलटण : प्रतिनिधी 

न्यू फलटण शुगर वर्क्स लि. साखरवाडी (ता. फलटण) या कारखान्याकडे सन 2017-18 च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाची एफआरपीप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आदा करण्यासाठी कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस, बगॅस इत्यादी उत्पादनांची विक्री करून रक्कम वसूल करण्यात यावी, तसेच आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेची विहीत पद्धतीद्वारे विक्री करण्याचे निर्देश साखर आयुक्त तथा विशेष निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र संभाजी कडू पाटील यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना दिले आहेत. 

कारखान्याने गाळप केलेल्या उसापोटी एफआरपीप्रमाणे उसाची किंमत ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील कलम 3 (3) च्या तरतुदीनुसार 14 दिवसात ऊस पुरवठादारांना अदा करणे बंधनकारक आहे तसेच विलंब कालावधीतील देयके कलम 3 (3 ए) नुसार विहितदराने व्याजासह देण्याची तरतुद आहे. न्यू फलटण शुगर वर्क्सच्या बाबतीत दि. 15 एप्रिल 2018 अखेरच्या ऊसदर देयबाकी अहवालानुसार कारखान्याकडे 2 लाख 83 हजार 457 मे.टन ऊसाचे एफआरपी प्रमाणे 47 कोटी 86 लाख 98 हजार रुपये रक्कमेची देयके थकीत आहेत. याचाच अर्थ कारखान्याने ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे या आदेशात नमुद करण्यात आले आहे. 

थकीत ऊस बिलाबाबत साखर आयुक्त कार्यालयाने जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये  संबंधीत सर्व साखर कारखान्यांना सुनावणीस हजर राहण्याबाबत कळविले होते त्यावेळी दि. 12 एप्रिल रोजीच्या सुनावणीस न्यू फलटण शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक संत उपस्थित होते. त्यांना थकीत एफआरपी अदा करण्याच्या सूचना दिल्या असता त्यांनी थकबाकी अदा करण्याचे मान्य केले होते तथापी पुरेशी संधी देवूनही कारखान्याने अद्याप थकीत एफआरपी रक्कमेचा भरणा केला नसल्याने हा कारखाना कारवाईस पात्र असल्याने वरीलप्रमाणे आदेश काढण्यात आल्याचे या संबंधीच्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.