Thu, May 23, 2019 04:17होमपेज › Satara › कालवडेचे दोघे अपघातात ठार

कालवडेचे दोघे अपघातात ठार

Published On: Feb 10 2018 1:38AM | Last Updated: Feb 10 2018 2:26AMनेर्ले : वार्ताहर 

मोटारसायकलला  अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आबासो यशवंत मोरे (वय 36) व राजाराम आत्माराम थोरात (वय 28, दोघेही रा. कालवडे, ता. कराड जि. सातारा) हे दोघेजण जागीच ठार झाले. वाळवा तालुक्यातील नेर्लेजवळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात गुरुवारी रात्री घडला. या अपघाताची नोंद कासेगाव पोलिसांत झाली आहे.
 आबासो मोरे व राजाराम थोरात हे दोघेही पेठ येथील बॉम्बे रेयॉन येथे  कामास होते. ते दोघे गुरुवारी रात्री कामावरून सुट्टी झाल्यानंतर मोटारसायकलने (क्र.एम.एच.11 एस 513) घरी येत होते.

नेर्ले नजिक हॉटेल दत्त भुवनजवळ त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, त्यांची मोटारसायकल 25 ते 30  फूट फरफटत गेली. गाडीचे साहित्य घटनास्थळी विखुरले होते. दोघेही रास्तकडेला झाडीत पडले होते. त्यांच्या डोक्याला, छातीला गंभीर मार लागला होता. अपघात सकाळी दिसला
शुक्रवारी सकाळी 6 च्या सुमारास कामावरून येणार्‍या  कामगार मित्रांनी अपघातातील मोटारसायकल पाहिली.त्यावेळी त्यांनी आजूबाजूला पाहिले असता मोरे, थोरात हे दोघे मृत अवस्थेत झाडीत पडले होते.

त्यानंतर ही घटना उघडकीस आली. अपघाताची माहिती मिळताच कालवडे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मृर्तदेहाची उत्तरीय तपासणी  करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. भरत थोरात यांनी पोलिसांत वर्दी दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक पवनकुमार चौधरी अधिक तपास करीत आहेत. मोरे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे. तर थोरात यांच्या पश्‍चात मुलगा, भाऊ, पत्नी, आई, वडील असा परिवार आहे.