Sun, Jul 21, 2019 12:52होमपेज › Satara › क्रांतीचा खून आठवीतील मुलाकडून

क्रांतीचा खून आठवीतील मुलाकडून

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 25 2018 12:36AMसातारा : प्रतिनिधी

नेर (ता. खटाव) येथील क्रांती शिर्के (वय 8) या चिमुरडीचा इयत्ता आठवीमध्ये शिकणार्‍या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्यानंतर गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. खुनानंतर क्रांतीचा मृतदेह गावातीलच विहिरीत टाकला. धक्‍कादायक बाब म्हणजे मृतदेह टाकण्यासाठी या मुलाच्या आईनेच त्याला मदत केली. दरम्यान, क्रांतीचा मारेकरी नात्यातीलच निघाल्याने गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या आईला ताब्यात घेतले आहे.

चिमुरड्या क्रांतीच्या खून प्रकरणाने गेल्या तीन दिवसांपासून समाजमन हेलावून गेले आहे. शनिवारी या घटनेबाबत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती  दिली. 
क्रांती ही दुसरीमध्ये शिकत असणारी मुलगी बुधवारी दुपारी घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ झाल्यानंतरही क्रांती सापडत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. गावकर्‍यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण गाव क्रांतीचा शोध घेत होते. मात्र, चिमुरडीचा शोध लागत नव्हता. बुधवार, गुरुवारची रात्र संपल्यानंतर शुक्रवारी सकाळी मात्र क्रांतीचा गावातीलच विहिरीत मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केल्यानंतर ही खुनाची घटना असण्याची पोलिसांची शक्यता बळावली.  पोलिस अधिकार्‍यांनी 
गावात व पुसेगाव पोलिस ठाण्यात तळ ठोकून तपासाला सुरुवात केली. क्रांतीचा घातपात झाल्याचा संशय आल्याने कुटुंबिय, ग्रामस्थ संतप्‍त बनले होते. या घटनेने गावातील वातावरणही तंग होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीसाठी केईएम रुग्णालयाचे फॉरेन्सिकचे पथकही नेरमध्ये पाचारण केले. शनिवारी या घटनेची सर्व हकीकत समोर आल्यानंतर  पोलिसही हादरुन गेले.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत घटनेबाबतची माहिती दिली. दि. 21 रोजी गावातीलच अल्पवयीन मुलाने क्रांतीचे अपहरण करुन तिच्यावर जवळच सुरु असलेल्या एका  बांधकामानजीक अत्याचार केले. या घटनेची माहिती आपण घरात सांगणार असल्याचे क्रांतीने सांगितल्यानंतर संशयित अल्पवयीन मुलाने तिचा तोंड दाबून खून केला. मृतदेह त्याच परिसरात ठेवल्यानंतर त्याने काही कालावधीनंतर ही घटना आपल्या आईला सांगितली.   त्यानंतर या दोघांनी क्रांतीचा मृतदेह विहिरीत टाकून दिला. 

पोलिस गेले दोन दिवस काही संशयितांना ताब्यात घेवून चौकशी करत होते. संशयित अल्पवयीन मुलाकडेही पोलिसांनी चौकशी केली. मात्र, तो सुरुवातीला आपला काही संबंध नसल्याचा अविर्भाव आणत होता. अल्पवयीन मुलगा वेगवेगळ्या वेळी थोडी वेगवेगळी माहिती देत असल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी त्याला विश्‍वासात घेतल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसही हादरुन गेले. सर्व घटनाक्रम अल्पवयीन संशयित मुलाने सांगितल्यानंतर प्राथमिक पुरावे गोळा करुन त्याच्यासह आईलाही ताब्यात घेण्यात आले.

संशयित मुलगा सध्या पुसेगाव पोलिसांकडे आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्‍त जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, सपोनि संभाजी गायकवाड, फौजदार प्रसन्‍न जर्‍हाड, पोलिस हवालदार सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, व्ही.एम.नागे, उत्तम दबडे, विजय शिर्के, ए.एम.भोईटे, तानाजी मानेे, रामा गुरव, विजय कांबळे, रुपेश कारंडे, मारुती अडागळे, सचिन माने, राजेंद्र कुंभार, सचिन जगताप, अमोल कणसे, किरण देशमुख यांनी सहभाग घेतला.
 

 

tags : Satara,news, Ner,kranti, Shirke, murder,