Wed, Nov 21, 2018 11:39



होमपेज › Satara › नेहरू युवा मंडळांना लागली उतरती कळा

नेहरू युवा मंडळांना लागली उतरती कळा

Published On: Jul 02 2018 1:49AM | Last Updated: Jul 01 2018 11:24PM



सातारा : विशाल गुजर

युवकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गावा-गावांमध्ये केंद्र सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने 1972 साली नेहरू युवा मंडळे सुरू करण्यात आली. परंतु, या मंडळांना सध्या उतरती कळा लागली आहे. जिल्ह्यात 1013 वरून आता फक्‍त 354 मंडळे उरली आहेत. काही वर्षांपासून निधी तर बंद झालाच, पण यंदा तर सरकारकडून तालुक्यातील समन्वयकांच्या नेमणुकासुद्धा अद्याप झाल्या नाहीत. मे महिन्यात या नेमणुका होणे अपेक्षित होते, परंतु एक महिना उलटून गेला तरी अद्याप त्याला मुहूर्त मिळालेला नाही. 

सातारा जिल्ह्यात एकूण 354 नेहरू युवा केंद्र आहेत. यात 13 ते 35 वर्षांपर्यंतचे युवक सभासद आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त सातारा आणि कराड तालुक्यात या मंडळांची संख्या जास्त आहे तर ही संख्या पाटण, माण- खटाव आणि महाबळेश्‍वर येथे सर्वात कमी आहे. या केंद्राच्यावतीने तालुक्याच्या मुख्य ठिकाणासह ग्रामीण भागात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, स्वच्छता अभियान’, कॅीशलेस व्यवहार’, योगा’, जलयुक्त शिवार’, हागणदारीमुक्त गाव’ एड्स जागृती महाअभियान, जीवन कोशल्य शिक्षण, मतदार जागृती अभियान’ आदी योजनांबाबत जनजागृती केली जाते. युवकांना सामाजिक कामात प्रोत्साहन मिळावे म्हणून युवा मंडळ सुरू करण्यासाठी सुरुवातीला अनुदान दिले जात होते. परंतु, आता ते अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे नवीन मंडळ सुरू करण्यासाठी युवक पुढे येत नसल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात जी 354 मंडळे सुरू आहेत, त्यांना सध्या निधी अभावी कार्यक्रम दिले जात नाहीत. 2017-18 मध्ये स्वच्छ गाव अभियान’ राबवले; परंतु त्याचेही अद्याप अनेक ठिकाणी पुरस्कार दिले गेले नाहीत. फक्त जिल्हा युवा मंडळ पुरस्कार दिला जात आहे.

सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येणे शक्य होत नाही. म्हणून राज्यातील प्रत्येक तालुक्यात ’तालुका समन्वयक’  नेमला जातो. त्यातून त्यांना रोजगार मिळत होता, तसेच सरकारकडून मानधन दिले जाते. मार्च-एप्रिलमध्ये यासाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागितले होते. त्यानंतर अर्ज कमी आल्याचे कारण देत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली होती. मे मध्ये निवडी होतील, अशी शक्यता होती. जूनमध्ये या निवडीची प्रक्रिया जिल्हा नेहरू युवा केंद्रांनी सुरू केली होती. परंतु पुन्हा त्याला स्थगिती दिल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे.