होमपेज › Satara › लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे समस्या कायम

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे समस्या कायम

Published On: May 29 2018 1:30AM | Last Updated: May 28 2018 10:36PMकराड : अमोल चव्हाण

मलकापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण 17 वॉर्ड पाडण्यात आले आहेत. त्यांपैकी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये रस्त्यांचा प्रश्‍न कायम असून भुयारी गटर योजनेसाठी उकरलेले रस्ते तसेच असल्याने लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय कोल्हापूर नाक्यावरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. वाहनांची वाढती संख्या व रस्त्यावर उभी राहणारी वडापची वाहने व ट्रॅव्हल्समुळे येथे लहानमोठ्या अपघातांची मालिकाच सुुरु आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मलकापूरमध्ये इतर ठिकाणी झालेल्या विकासाच्या तुलनेत येथे अजूनही विकासाला वाव असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरीही नगरपंचायतीने गत नऊ वर्षांत राबविलेले उपक्रम व योजनांमुळे तसेच महामार्गालगत हा वॉर्ड येत असल्याने येथे झालेला विकास नजरेआड करून चालणार नाही.    

मलकापूरमधील वॉर्ड क्रमांक 1 हा महामार्गाच्या पश्‍चिम बाजूस असून लाहोटीनगरमधील रस्ता ते कोयनानदीपर्यंतचा संपूर्ण परिसराचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे महामार्गाला लागूनच हा वॉर्ड आहे. याचा परिणाम म्हणून महामार्गावर पावसाळ्यात साचणारे पाणी 

महामार्गालगत असलेल्या नाल्यात बसले नाही तर ते पाणी बाजूच्या जमिनीमध्ये पसरत असते. त्यातच महामार्गालगत असलेल्या सोसायटी पेट्रोलपंपापासून महामार्गावरील पाणी पुन्हा पश्‍चिम बाजूला वाहत जाते. ते पाणी लाहोटीनगरजवळ असलेल्या ओढ्यातून तेथून जवळच असलेल्या पश्‍चिम बाजूच्या शेतात जाऊन शेतीचे नुकसान होत असते. यावर अद्याप काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

त्यातच शहरात सध्या युद्ध पातळीवर रस्त्यांची कामे सुरु आहेत. तशीच ती वॉर्ड क्रमांक 1 मध्येही सुरु आहेत. मात्र, भुयारी गटर योजनेसाठी उकरण्यात आलेल्या रस्त्यांमुळे येथील जनता मेटाकुटीस आली आहे. उकरलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना विशेषत: महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुचाकी वाहनधारकांचे तर दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्यांची कामे त्वरित करावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. हौसाई कन्याशाळेच्या परिसरात तर लोकांना सोयी-सुविधा मिळविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठीमागे लागून वारंवार तक्रारी करूनही तक्रारींचे वेळेवर निवारण होईल, याची खात्री देता येत नाही. 

कोल्हापूर नाक्याचा परिसरही या वॉर्डमध्ये येत असल्याने लोकांना नेहमीच वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. रस्त्यावर उभा राहत असलेल्या वडापच्या वाहनांमुळे व ट्रॅव्हल्समुळे येथे लहानमोठ्या अपघातांची मालिकाच सुरु असते. तर रस्त्यावर वाहने उभी करणार्‍यांच्या दादागिरीमुळे या परिसरात नेहमीच तणावाचे वातावरण असते. काही दिवसांपूर्वी येथे मलकापूर- आगाशिवनगर येथील एकाने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. अशा घटनांमुळे कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. 

रस्त्यावर वाहने उभी करून प्रवासी घेतले जात असल्यामुळे येथे मोठ्या अपघाताचाही धोका संभवतो. तर सातारा व पुणे बाजूकडे जाण्यासाठी अनेकजण महामार्गावरच उभे राहत असल्याने व त्यांना घेण्यासाठी वडापची वाहने किंवा ट्रॅव्हल्स रस्त्यावरच उभ्या केल्या जात असतात. यामुळे पाठीमागून एखादे वाहन भरधाव वेगात आले तर मोठा अपघात होऊ शकतो. यासाठी येथे पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे. असे असलेतरी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे राबवली आहेत. लोकांना भुयारी गटर योजना पूर्ण झाल्यानंतर सांडपाण्याचा त्रास होणार नाही. स्वच्छता सर्व्हेक्षणमध्येही या वार्डमध्ये चांगले काम झाले होते.