कराड : प्रतिनिधी
हेल्मेट सक्तीबाबत महाराष्ट्रात गांभिर्यच दाखवले जात नाही. मात्र दिवसेंदिवस वाढणारे अपघात आणि त्यात बळी जाणार्या नागरिकांची संख्या पाहिली असता हेल्मेटसक्तीबाबत कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त आरटीओ कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिंदे होंडाचे बबनराव शिंदे, बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील, माजी नगरसेवक अशोकराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हेल्मेट सक्तीसह वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याकडे बहुतांश वाहन चालकांचे दुर्लक्ष होत आहे. हेल्मेट सक्तीबाबतही न्यायालयाने निर्देश दिले आहेत. अनेकदा अपघातात भरपाईही मिळत नाही. देशातील अनेक राज्यात हेल्मेट सक्ती काटेकोरपणे राबवली जाते. मात्र महाराष्ट्रात याउलट चित्र पहावयास मिळते. केवळ मोटारसायकल स्वारास नव्हे, तर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घालणे आवश्यक आहे.
शिंदे होंडाचे अमर शिंदे यांच्यासह सुनिल पाटील, अशोकराव पाटील, सतीश पवार, शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांचीही भाषणे झाली. या सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.
जुनी वाहने स्क्रॅपमध्ये घाला ...
सध्यस्थितीत आपल्याकडे जुनी विशेषतः 15 वर्षाहून अधिक काळ वापरात असलेली अनेक वाहने रस्त्यावर धावतात. अशा वाहनांमुळे प्रदूषणाचा विषय गंभीर बनला आहे. त्यामुळे अशी वाहने रस्त्यावर धावणे मानवी आरोग्यासाठी घातक असून अशी वाहने स्क्रॅपमध्ये घालणे काळाची गरज बनल्याचेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.