Tue, Apr 23, 2019 00:11होमपेज › Satara › प्रगत देशासाठी धर्मवाद दूर ठेवणे आवश्यक : शिवराज पाटील 

प्रगत देशासाठी धर्मवाद दूर ठेवणे आवश्यक : शिवराज पाटील 

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 11:13PMकराडः प्रतिनिधी

देशाची प्रगती साधायची असेल तर धर्मवाद, जातीवाद, प्रांतवाद व भाषावाद यांना दूर ठेवावे लागेल, असे प्रतिपादन माजी गृहमंत्री शिवराज पाटील- चाकुरकर  यांनी केले. 

खोडशी ता. कराड येथील कोयना दूध संघावर शनिवारी सायंकाळी आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर,रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, अ‍ॅड. उदयसिंह पाटील, अ‍ॅड. रवींद्र पवार, कॉ. सयाजीराव पाटील  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शिवराज पाटील म्हणाले, जाती धर्माच्या वादातून कधीच कोणाचे भले झालेले नाही. आपलेही होणार नाही. या वादामुळे देश मागे पडेल. देश पुढे न्यायचा असेल तर जाती धर्माच्या भिंती पाडायला हव्यात. जातीपातीचा प्रश्‍न बाजूला ठेऊन आपल्यातील उणीवा आपणालाच दूर कराव्या लागतील. 

देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र, जाती-धर्माविषयी बोलताना प्रत्येकाने विचार करायला हवा. गिता, बायबल, कुराण, बौध्द या सर्वच धर्मांनी व धर्मग्रंथांनी आपल्याला मानवतेची शिकवण दिली आहे. कोणत्याही  ग्रंथात हिंसाचाराचे समर्थन केलेले नाही. आपण एकाच धर्माचा अभ्यास करतो आणि दुसर्‍या धर्माला कमी लेखतो. परंतु सर्वच धर्मांचा व्यापक अभ्यास करणे गरजेचे आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती बाजुला सारून माणुसकी हाच धर्म स्वीकारला पाहिजे.

कम्युनिस्ट पक्ष हे आमचे मित्र आहेत. त्यांना सोबत घेऊनच आम्ही वाटचाल करणार आहोत. देशात अभिव्यक्ती म्हणजेच व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. लोकशाहीने प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे आणि घटनेने त्याला संरक्षण दिले आहे. माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राहणे गरजेचे आहे. माध्यम हे समाजमनाचा आरसा आहे. या आरशातुनच चांगले-वाईट समोर येते. त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य कायम राहणे गरजेचे आहे. सध्याचे युग सोशल मिडीयाचे आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. भविष्यात संपूर्ण शिक्षण हे मोबाईलव्दारे होईल. 

विलासराव उंडाळकर म्हणाले, चांगल्या विचारांचे आदान प्रदान व्हावे या हेतूने या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कोयना दूध संघ, खरेदी-विक्री संघ, बार असो. चे पदाधिकारी, तसेच शेती उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.