Fri, Mar 22, 2019 07:44होमपेज › Satara › कामगारांचा पांडुरंग : आमदार शशिकांत शिंदे

कामगारांचा पांडुरंग : आमदार शशिकांत शिंदे

Published On: Jul 22 2018 11:08PM | Last Updated: Jul 22 2018 9:03PMराष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन या संघटनेची स्थापना सन 2006 साली आ. शशिकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून झाली. कामगार क्षेत्रात काम करीत असताना कामगारांचे अनेक प्रश्‍न आमदार साहेबांकडे वारंवार येत असत. या कामगारांमध्ये कारखाने व इतर उद्योगातील कामगार मोठ्या प्रमाणावर होते. या कामगारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी हक्काची संघटना असणे गरजेचे होते. यासाठी आ. शशिकांत शिंदे यांनी या संघटनेची स्थापना केली अन् इथूनच खर्‍या अर्थाने तमाम कामगारांच्या जीवनात पुन्हा एकदा नवी पालवी फुटली. कामगारांना हक्काचा असा पहाडी नेता मिळाला. कुठे अन्याय झाला तर काळ्या रात्रीही धावून येणारं हे नेतृत्व म्हणजे आपला पांडुरंगच असल्याची भावना तमाम कामगारांमध्ये आहे. 

सुरवातीच्या काळात नवी मुंबई, ठाणे या परिसरातील औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार हे या संघटनेचे सभासद होते. किंबहुना या क्षेत्रातील कामगारांसाठीच आमदार साहेबांनी या संघटनेची स्थापना केली. कामगारांच्या प्रश्‍नांचा पाठपुरावा करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचा उद्देश, या पाठीमागे होता.  संघटनेची सुरुवातीची वाटचाल संथ परंतु सातत्यपूर्ण रितीने सुरु होती. कल्याण, वाडा, ठाणे या परिसराबरोबरच रायगड व पुणे जिल्ह्यातील कामगारही संघटनेच्या कार्यपद्धतीकडे आकर्षित झाले. परिणामी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर, चाकण, रांजणगाव या औद्योगिक क्षेत्रात संघटनेचा कार्यविस्तार वाढला.  

आ. शशिकांत शिंदे साहेबांसारखे दृष्टे नेतृत्व व कामगार प्रश्‍नाची सखोल जाण असणारा नेता असल्याने अल्पावधीतच पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात संघटनेचा दबदबा वाढला. दरम्यानच्या काळात संघटनेने ठेकेदारी पद्धतीने काम करणार्‍या कामगारांना कायम कामगार करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. तसेच कामगारांच्या वेतनमानामध्ये लक्षणीय वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न केले. संघटनेच्या या योगदानामुळे आमदार साहेबांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यातील कामगार आमदारांच्या या करिष्म्यापासून अलिप्त राहिले असते तर नवलच. कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील कामगार आमदार साहेबांकडे पर्यायाने संघटनेकडे आकर्षित झाले. तेथील   मे. वालचंदनगर इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड फौंड्री डिव्हीजन, सातारारोड येथील प्रस्थापित युनियनच्या अन्यायाविरुद्ध आमदार साहेबांच्या ‘कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना’ हे ब्रीद असलेल्या राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने तेथील कामगारांचे नेतृत्व स्वीकारावे, अशी कामगारांची मागणी जोर धरु लागली. 

40 वर्षे या कंपनीमध्ये प्रस्थापित युनियनची जणू मक्तेदारी निर्माण झाली होती. ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी व सामान्य कामगाराला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आ.शशिकांत शिंदे साहेबांसारखे सक्षम व खंदे नेतृत्व गरजेचे होते. ते पुढे सिद्धही झाले. सातारा औद्योगिक क्षेत्रातील इतर अनेक छोट्या मोठ्या आस्थापनातील  कामगारांनाही संघटनेने सर्व परिचित ठेकेदारी पद्धतीतून बाहेर काढून कायम कामगार केले. आज त्याचाच परिणाम म्हणून साताराच्या विविध आस्थापनातील कामगार कंपनीचे कायम कामगार  झाले. हक्कासाठी लढा देणे ही एक प्रदिर्घ प्रक्रिया असून संघटनेने ती तेवढ्याच प्रभावीपणे जिवंत ठेवली आहे.

- शब्दांकन : इम्तियाज मुजावर