Thu, Mar 21, 2019 23:25
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › खंडाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट

खंडाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 09 2018 12:18AMखंडाळा : श्रीकृष्ण यादव 

खंडाळा नगरपंचायतीमध्ये उपनगराध्यक्ष यांच्यावरील अविश्‍वास ठराव मंजूर झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. आमदारांच्या मतदारसंघातील मोठ्या गावात 4 नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने खंडाळा राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. त्यामुळे खंडाळा नगरपंचायतीवर असणारी राष्ट्रवादीची सत्ता आता शहर विकास आघाडीने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे दोन वर्षांतच नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे बदलली असून आता काँग्रेस 7 आणि शहर विकास आघाडी 5 असे एकूण 12 उमेदवार एकत्र आल्याने सत्तेच्या घडामोडीत राष्ट्रवादीचा खेळखंडोबा झाला आहे.

नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना नगरपंचायतीने खरेदी केलेल्या साहित्यावरून सत्ताधारी दोन गटातच खडाजंगी झाली होती. या  साहित्याची बिले अदा करण्याबाबत मांडलेल्या ठरावाला सत्ताधारी एका गटानेच विरोध दर्शवला होता. तेव्हा याला विरोधी काँग्रेसच्या गटाने पाठींबा दिल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी अडचणीत आली होती. या घटनेनंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले होते. 

पहिल्यांदा नगराध्यक्ष यांच्या कामकाजावर राष्ट्रवादीतील एका गटाने नाराजी व्यक्त करत  त्यांचा सेवाकाल संपला असे कारण पुढे करत नगराध्यक्ष बदलाची मागणी सुरू केली. मात्र, ठरल्याप्रमाणे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देत नसल्याने नगराध्यक्ष बदलाच्या हालचाली गतीमान झाल्या. विरोधकांसह राष्ट्रवादीच्या एका गटाचा वाढता विरोध, नागरिकांची नाराजी यामुळे अखेर नगराध्यक्षांना राजीनामा देणे भाग पडले. नूतन नगराध्यक्ष निवडीवेळी राजकीय डावपेच आखत शहराच्या विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादीचे काही नगरसेवक, काँग्रेसचे सर्व नगरसेवक यांनी खंडाळा शहर विकास आघाडीची स्थापना केली. यानंतर राष्ट्रवादीचा विरोध मोडीत काढून लता नरुटे यांची नगराध्यक्षपदी निवड केली. 

यावेळी विरोधी काँग्रेस पक्षातील नगरसेवकांनी त्यांना पाठींबा देऊ केला होता. नगराध्यक्ष बदलाच्या घडामोडीनंतर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे यांच्या विरोधात शहर विकास आघाडीकडून अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. या प्रस्तावावर 11 सदस्यांच्या सहया होत्या. मात्र, अन्य एका नगरसेवकाची कमतरता होती. त्याची बांधणी करत सर्व बारा नगरसेवक सहलीवर गेले. अविश्‍वास प्रस्तावावर विशेष सर्वसाधारण सभा बोलविली. 

या सभेत काय होणार हे खंडाळकर जाणून होते. अविश्‍वास ठराव मंजूर होऊ नये यासाठी व्यूहरचना केली होती. पुढे काय होऊ शकते त्याला शह देण्यासाठी शहर विकास आघाडीने नियोजन केले होते. सभेच्या पार्श्‍वभूमीवर  तणावपूर्ण वातावरण लक्षात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या सभेसाठी शहर विकास आघाडीला सहकार्य करणार्‍या नगरसेवकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, महिला नगरसेवकांच्या दक्षतेने तो असफल ठरला.

अविश्‍वास  प्रस्तावाच्या बाजूने नगराध्यक्षा लताताई नरुटे यांच्यासह नगरसेवक अनिरुद्ध गाढवे, सुप्रिया गुरव, उज्ज्वला संकपाळ, दत्तात्रय गाढवे, पंकज गायकवाड, प्रल्हाद खंडागळे, कल्पना गाढवे, युवराज गाढवे, जयश्री जाधव, साजिद मुल्ला आणि वनिता संकपाळ यांनी मतदान केले.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या  राजकीय घडामोडीत शहरातील राष्ट्रवादी खिळखिळी होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. सत्तासंघर्षात दुखावलेली मने पक्षीय पातळीवर यापुढे एक होणार की दुरावा ठेवणार? यावर राष्ट्रवादीची पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे. तर विकासाच्या मुद्यावर एकत्र आलेले विरोधक यापुढे नगरपंचायतीचे कामकाज एकविचाराने करतात की मागचे दिवस पुढे आणतात. यावरच खंडाळ्याचा विकास अवलंबून आहे. सत्तेच्या सारीपाटावर शहराच्या विकासाचा मुद्दा मागे पडू नये. अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होवू लागली आहे.