Sun, Jul 21, 2019 12:47होमपेज › Satara › उदयनराजे, 23 प्रश्‍नांची उत्तरे द्या

उदयनराजे, 23 प्रश्‍नांची उत्तरे द्या

Published On: Apr 16 2019 2:21AM | Last Updated: Apr 16 2019 12:23AM
सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे.  विकासकामांच्या चर्चेवर उदयनराजेंनी समोरासमोर यावे. त्यांची संसदेतील उपस्थिती किती? त्यांनी अधिवेशनात सातारकरांच्या किती समस्या मांडल्या? उदयनराजेंनी  आम्ही उपस्थित केलेल्या 23 प्रश्‍नांवर स्वत: जनतेला खुलासा करावा, अशा शब्दात महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी खा. उदयनराजेंना पत्रकार परिषदेत आव्हान दिले.

नरेंद्र पाटील म्हणाले, यापूर्वी अनेक मुद्दे जाहीरपणे मांडले पण उदयनराजेंनी त्याची उत्‍तरे दिलेली नाहीत. त्यामुळे परिवर्तन होणार हे निश्‍चित आहे. त्यांची अवस्था पाहिल्यावर त्यांना सातार्‍याची अपूर्ण माहिती आहे असे वाटते. जिल्ह्यातील जनता निवडून देवून खासदार म्हणून देशाच्या संसदेत पाठवते. पण उदयनराजेंनी खासदार झाल्यावर काय केले? खासदारसाहेब तुम्ही दहा वर्षे संसदेत आहात पण तुमच्या संसद कार्यकाळ उपस्थितीत तुमचा नंबर शेवटून पहिला आहे. अवघी 23 टक्के उपस्थिती असण्यामागचं कारण काय? सातारच्या जनतेने तुम्हाला त्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी संसदेत पाठवले. त्यांचे शून्य प्रश्‍न तुम्ही संसदेत मांडले, याचं कारण काय? लोकसभेत देशहिताच्या अनेक चर्चा घडत असताना त्यातील एकाही चर्चेत गेल्या 10 वर्षांत तुम्ही सहभागी झाला नाहीत हे खरं आहे का? तुम्हाला खासदार निधी मिळतो तो निधी सोडून जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही किती निधी आणला? सर्व विधानसभा मतदारसंघात सर्वांना समान निधी दिलात का? दिला नसेल तर का नाही दिला? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात शेकडो नवीन किल्‍ले बांधले, तुम्ही एका तरी गड किल्ल्याचे संवर्धन केले का? स्वराज्याची राजधानी म्हणून सातार्‍यात येणार्‍या शिवभक्‍तांना छत्रपतींचे प्रेरणास्थान म्हणून तुम्हाला 10 वर्षांत साधं एक वस्तूसंग्रहालय उभारता आले नाही, याचं कारण काय? मागील 10 वर्षांत फक्‍त टोलनाक्याच्या ठेक्यासाठी रस्त्यावर उतरलात. परंतु सर्वसमान्यांच्या कोणत्याही प्रश्‍नासाठी कधी रस्त्यावर उतरला नाही. तुमचा टोलनाक्यात इतका इंटरेस्ट का? सुशिक्षित तरुण-तरुणींना रोजगार मिळावा म्हणून 10 वर्षांत तुम्ही नक्‍की काय केलंत?   नोकरी म्हणजे ‘टोलनाक्या’वरची आणि व्यवसाय म्हणजे ‘वाळू’चा आणि ‘वसुली’चा. रोजगाराच्या अशा तुमच्या या दोनच व्याख्या आहेत का? आणि उद्योजकांनी कारखानदारी विकून आता बिटकॉईनमध्ये तेजी-मंदी करावी का? वर्षांपूर्वी तुम्ही ‘भू-माता’ यात्रा काढली.  त्या यात्रेतील किती मागण्या तुम्ही पूर्ण करुन घेतल्या? खासदार नसताना तुम्हाला कोयनेची वीज, कृष्णेचे पाणी या सर्वांबद्दल जबरदस्त तळमळ होती, ती तळमळ आता कुठे वाहून गेली?  साक्षात तुम्ही विरोध करुनही कोरेगावचा जरंडेश्‍वर साखर कारखाना विकला गेला. मग ज्यांनी विकत घेतला असे तुमचे न ऐकणारे ‘ते’ नक्‍की कोण? सुरु असणार्‍या उद्योगांच्या गळ्याला नख लावणे हे तुमचे धोरण का? कारखाने उभे राहिल्याने बेरोजगारी दूर होते आणि कारखाने बंद पडल्याने हजारो तरुण बेरोजगार होतात याच्याशी तुम्ही सहमत आहात का? 

आपल्या भागातून जाणार्‍या एकमेव आशियायी महामार्गाच्या पूर्ततेसाठी तुम्ही काय काय केले? सहा विधानसभा मतदारसंघात आणि सातार्‍यात असणार्‍या खासदार कार्यालयाचा नक्‍की पत्‍ता काय? ऊसाला योग्य भाव मिळावा आणि साखर कारखानदारी अडचणीतून बाहेर येण्यासाठी तुम्ही काय केले? तुम्ही थेट वंशज बिरुद लावून घेता. तुम्ही रयतेचे राजे न होता फक्‍त स्वार्थी ‘टोळक्या’चे राजे बनून गेलात. भवानीमाता ट्रस्टबाबत तुमची भूमिका नक्‍की काय? लोकसभेतील अवघ्या 23 टक्के उपस्थितीचा, 23 प्रश्‍नांचा न्याय जनता 23 एप्रिलला करेल आणि त्याचा निकाल 23 मेला नक्‍की आमच्या बाजूने असेल, असा विश्‍वास नरेंद्र पाटील यांनी व्यक्‍त केला.  

छत्रपतींचे तेरावे वंशज असल्याने तुमचा निश्‍चित आदर आहे.  पण मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती संसदेत प्रयत्न करतात त्यावेळी तुम्ही काय करत होतात? शेतकर्‍यांच्या सातबारावरील शिक्के उठत नाहीत. त्यांनी स्थानिकांना टोलमुक्‍त का केले नाही? या प्रश्‍नांची उत्‍तरे खासदारांनी स्वत: शुध्दीत राहून द्यावीत, असे चॅलेंजही पाटील यांनी केले.  यावेळी प्रदेश प्रवक्‍ते माधव भंडारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अ‍ॅड. भारत पाटील, दत्‍ताजी थोरात, हणमंत चवरे आदि प्रमुख उपस्थित होते. 

मर्द असल्यामुळे मिशा पिळतो...
मी मर्द असल्यामुळेच मी मिशा पिळतो, असा टोला उदयनराजेंना लगावून नरेंद्र पाटील म्हणाले, मिशांचा पीळ राहतो पण कॉलर टाईट रहात नाही. मावळमध्ये पार्थ पवारांच्या सभेत मीमिक्री केली. त्यांनी कोणत्या प्राण्याचा आवाज काढला माहित नाही. पण ते मीमिक्री  आर्टिस्ट आहेत.