Tue, Jun 02, 2020 00:29
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › उदयनराजेंविरूद्ध नरेंद्र पाटील हाय व्होल्टेज लढाई

उदयनराजेंविरूद्ध नरेंद्र पाटील हाय व्होल्टेज लढाई

Published On: Mar 25 2019 1:50AM | Last Updated: Mar 25 2019 12:17AM
सातारा : प्रतिनिधी

भाजपचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी रविवारी कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांनी त्याचवेळी सातार्‍यातून खा. उदयनराजेंच्या विरोधात त्यांच्या उमेदवारीची घोषणाही केली. त्यामुळे सातारा मतदारसंघात आता उदयनराजेंविरुद्ध नरेंद्र पाटील, अशी हायहोल्टेज लढाई पाहायला मिळणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या खा. उदयनराजेंविरोधात कोण, असा सस्पेन्स गेल्या काही दिवसांपासून कायम होता. सातारा मतदारसंघ युती अंतर्गत शिवसेनेकडे असल्यामुळे येथून सेनेतर्फे कोण मैदानात उतरणार याची उत्कंठा लागून राहिली होती. या पार्श्‍वभूमीवर ना. नरेंद्र पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी अचानक हजेरी लावत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर रविवारी त्यांनी कोल्हापूर येथे भाजप-शिवसेनेच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रचार शुभारंभाच्या  जाहीर सभेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सातार्‍यातील लढत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले. 

सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत खा. उदयनराजे यांनी विक्रमी मताधिक्य घेत विजयश्री मिळवली आहे. गतवेळच्या निवडणुकीत तर देशभरात मोदी लाट आली असतानाही खा. उदयनराजे विक्रमी मताधिक्याने संसदेत पोहोचले. यावेळी ते आता हॅटट्रीक करणार का? याची राजकीय वर्तुळात उत्कंठा लागून राहिली आहे. गतवेळच्या निवडणुकीपेक्षा यावेळचे राजकीय वातावरण क्‍लिष्ट झाले आहे. उदयनराजेंना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेपर्यंत बराच संघर्ष करावा लागला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: पक्षांतर्गत मतभेद   मिटवून उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतरही पक्षात दिलखुलास वातावरण आहे, असे चित्र अद्यापतरी पुढे आलेले नाही. मात्र, मतदार संघातील पक्षाचे प्राबल्य व खा. उदयनराजेंची क्रेझ यामुळे राष्ट्रवादीकडून विजयाची खात्री दिली जात असतानाच शिवसेनेने भाजपच्या ना. नरेंद्र पाटील यांना गळाला लावत या मतदार संघात कडवे आव्हान उभे केले आहे. 

ना. नरेंद्र पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे सातार्‍यातील राष्ट्रवादीच्या अनेक नेतेमंडळींशी त्यांचे ऋणानुबंध आहेत. माथाडी नेता म्हणून  त्यांच्याकडे तडफ आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी मतदार संघात रान उठवून आपली रणनिती स्पष्ट केली होती. या लढाईत त्यांना आता शिवसेना नेत्यांची साथ लाभणार असली तरी भाजपाला आपल्यासोबत सक्रीय करण्यात ते कितपत यशस्वी होतात यावरही त्यांच्या यशाची गणिते अवलंबून राहणार आहेत. 1996 नंतर या मतदार संघात पुन्हा एकदा सेनेचा भगवा फडकावण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे खा. उदयनराजे व नरेंद्र पाटील यांच्यातील हायहोल्टेज लढाईची जोरदार चर्चा  रंगू लागली आहे. 

माथाडी कामगाराला खासदार बनवून दिल्लीला पाठवणार : उद्धव ठाकरे

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील युतीच्या जाहीर सभेत सातार्‍यातून शिवसेनेतर्फे नरेंद्र पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र पाटील यांच्या रूपाने माथाडी कामगाराला खासदार बनवून दिल्लीला पाठवणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सध्या या पक्षातून त्या पक्षात पळवापळवी सुरू आहे. मात्र, मी कोणाला कोठूनही पळवून आणलेले नाही. सातारा लोकसभेसाठी मी नरेंद्र पाटील यांना भाजपकडून मागून घेतले आहे. माथाडी कामगारांनी किती वर्षे नुसते ओझेच वाहायचे. या माथाडी कामगारांच्या नेत्याला खासदार बनवून दिल्लीला पाठवायचं आहे. नरेंद्र पाटील यांच्या निमित्ताने मला बाळासाहेब ठाकरे व अण्णासाहेब पाटील यांच्यातील असलेले ऋणानुबंध आठवले. हे ऋणानुबंध यापुढेही कायम राहतील, असा विश्‍वास ठाकरे यांनी व्यक्‍त केला.