कोरेगाव : प्रतिनिधी
‘अमर रहे अमर रहे, नारायण ठोंबरे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, जब तक सुरज चाँद रहेगा, नारायण तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी घोषणा व विराट जनसमुदायाच्या साक्षीने सुभेदार नारायण ठोंबरे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. वाठार (किरोली) येथील स्मशानभूमीत मुलगा सूरज व धीरज यांनी अग्नी दिल्यानंतर सुभेदार ठोंबरे अनंतात विलीन झाले.
सुभेदार नारायण ठोंबरे यांचे आसाममधील तेजपूर भागात कोर तोफखाना ब्रिगेडमध्ये देशसेवा बजावत असताना हृदयविकाराने निधन झाले होते. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास त्यांचे पार्थिव जन्मगावी वाठारमध्ये आणण्यात आले. यावेळी आख्खं गाव गलबलून गेले. त्यांच्या घरासमोरील श्री अंबामाता मंदिराच्या पटांगणात पार्थिव ठेवण्यात आले होते. स्व. सुभेदार नारायण ठोंबरे यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी रिघ लागली होती. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून सुभेदार नारायण ठोंबरे यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला.
शोकाकुल वातावरणात निघालेली अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली तेव्हा ‘अमर रहे अमर रहे, नारायण ठोंबरे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, जब तक सुरज चाँद रहेगा, नारायण तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी घोषणांनी वातावरण आणखी शोकाकूल झाले. पत्नी शोभा, कुटुंबिय व नातेवाईक यांना अखेरचे दर्शन घेताना शोक अनावर झाला. यावेळी उस्थितांचे डोळेही पाणावले.
सैन्यदलाच्या जवानांनी मानवंदना दिल्यानंतर मुलगा सुरज व धीरज यांनी अग्नी दिला. जनसागराच्या साक्षीने सुभेदार ठोंबरे अनंतात विलीन झाले. यावेळी शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.