Wed, Apr 24, 2019 11:31होमपेज › Satara › प्रतापगडच्या शौर्याचे सर्वदूर हादरे 

प्रतापगडच्या शौर्याचे सर्वदूर हादरे 

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 9:19PMछत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील सर्वांत मोठे पहिले संकट म्हणजे अफझलखानाची स्वारी. परंतु महान युक्तीने महान शक्तीवर केलेली यशस्वी मात म्हणजे शिवरायांचे प्रतापगडावरील अलौकिक शौर्य होय. सोमवार दि. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानास ठार केले. प्रतापगडापासून विजापूरपर्यंत आणि विजापूरपासून दिल्लीपर्यंत भारताच्या राजकारणाला जबरदस्त दणका देणार्‍या या घटनेने खर्‍या अर्थाने हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. या प्रसंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव संपूर्ण हिंदूस्थानसह अवघ्या जगात झाले.

छ. शिवरायांना पकडून आणणे अथवा ठार करुन येणे असा पैजेचा विडा उचलून विजापूरच्या आदिलशहाला अफझलखानास शब्द द्यावा लागला होता. खान प्रचंड शक्तिमान, धिप्पाड कसलेल्या विजापूरच्या आदिलशहाचा एकमेव वारसदार होता. परंतु क्रूर कृत्य करण्यात निष्णात होता. कर्नाटकचा राजा कस्तुरी रंगाला त्याने विश्‍वासघाताने ठार केले होते. छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजी राजांना विश्‍वासघाताने कनकगिरीच्या लढाईत नियोजनपूर्वक ठार केले होते. खानाने शहाजीराजांचाही अवमान केला होता.

अफझलखानाने विजापूर ते वाई मार्गामार्गातील हिंदूंची अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. तो स्वत:ला ‘बुनशिकन’ आणि ‘कुफ्रशिकन’ म्हणून घेई. ‘मूर्ती आणि मूर्तीपूजकांचा विध्वंसक हा याचा अर्थ. अनेक गावे लुटली, कपटी कारस्थाने करण्यात तो निष्णात होता. बुधवार दि. 10 डिसेंबर 1659 रोजी राजापूरचा इंग्रज व्यापारी मायदेशी पाठवलेल्या टपालात लिहितो की ‘शिवाजीस दग्याने, कपटाने नाहीसे करावे, ठार करावे’ असे विजापूरच्या बड्याबेगमने खानास गुप्तपणे सांगितले होते. अफझलखानाने 25 हजारांहून अधिक प्रचंड फौज बरोबर आणलेली होती. तसेच 300 ते 400 तोफा बरोबर आणल्या होत्या. शिवरायांच्यावर चालून आलेली ही सर्वांत मोठी फौज होती. तसेच काही मराठा आणि मुस्लीम मातब्बर सरदारही बरोबर घेतले होते. या तुलनेने शिवरायांच्याकडे चार ते साडेचार हजार फौज होती. 

परंतु शिवाजीराजे रणनीतीमध्ये खानास वरचढ होते. खानाचा हेतू त्यांनी ओळखला होता. युद्ध कोणत्या शस्त्राने लढले जाते हे जसे महत्वाचे असते तसेच ते कोठे लढले जाते हेही महत्वाचे असते. खानाला प्रतापगडाच्या पायथ्याला आणण्यात राजे यशस्वी झाले. येथेच खान अर्धी लढाई हरला होता. आपण खूप घाबरुन गेलो आहोत, असे आपल्या वकीलामार्फत गोपीनाथ पंतामार्फत राजांनी खानास कळवून त्यास हरभर्‍याच्या झाडावरती चढवले. अगदी सय्यद बंडाला शामियान्यातून दूर करण्याची खास विनंती म्हणजे शिवरायांच्या चातुर्य कलेचा भाग होता. त्यामुळे खानाचा घमेंड गर्व फारच वाढला. शिवाजी आपणास घाबरतो, अशी खात्री झाली. शिवरायांनी त्यांच्या या फाजील आत्मविश्‍वासाचा बरोबर फायदा उठवला. अफझलखानाने राजास भेटीसमयी आवळले. कुशीत खंजीर खुपसले, परंतु अंगात चिलखत व डोक्यावर जिरेटोप असल्यामुळे खरचटण्यापलिकडे काहीही झाले नाही. पोलादी वाघ नख्याने डाव साधला. 

सोमवार दि. 10 नोव्हेंबर 1659 रोजी सायंकाळी 5.30 वा. खान कोसळला. खानाच्या वकिलाने कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवरायांच्यावर समशेर चालवली. पण जिरेटोपामुळे किरकोळ जखम झाली. राजाने तत्काळ वकिलास ठार केले. सय्यद बंडाचा वार जीवामहालाने वरचेवर उचलला. जिकडे तिकडे प्रचंड हा:हा:कार उडाला. खान ठार झाल्याची बातमी हेरांनी तत्काळ सर्वत्र पसरवली.

जागतिक सात युद्धामध्ये शिवरायांचे शौर्य

एकूण लहानात लहान शक्तीने कमीत कमी वेळात मोठ्या शक्तीवर मिळवलेला निर्णायक विजय म्हणजे प्रतापगडावरील शिवप्रताप होय. म्हणूनच या युद्धाची जागतिक सात युद्धात गणना केली जाते. तसेच अनेक परकीय देशातील लष्करास यातील युद्धतंत्र प्रात्यक्षिकासह शिकवले जाते. अशा या छत्रपती शिवरायांच्या अलौकिक शौर्यामुळे या गडास प्रतापगड असे नामकरण लाभले आहे.

- प्रा.डॉ.शिवाजीराव चव्हाण, सातारा