Mon, Apr 22, 2019 06:27होमपेज › Satara › नागपूरमधील हवाला प्रकरणातील चौघांना महाबळेश्‍वरमध्ये अटक 

नागपूरमधील हवाला प्रकरणातील चौघांना महाबळेश्‍वरमध्ये अटक 

Published On: May 03 2018 1:32AM | Last Updated: May 02 2018 11:53PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

हवाला प्रकरणातील सुमारे अडीच कोटी रुपयांचा अपहार करून फरार झालेल्या नागपूर येथील दोन अट्टल गुन्हेगारांसह चार जणांना सातारा शाहूपुरी व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ‘फिल्मी स्टाईल’ थरारक पाठलाग करून महाबळेश्‍वरमध्ये  अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 82 हजार 500 रुपये हस्तगत केले असून उरलेल्या रकमेचा तपास करण्यासाठी चारही आरोपींना मध्यरात्री स्थानिक पोलिसांनी नागपूर पोलिसांच्या हवाली केले.

सचिन ऊर्फ शशांक नारायण पडगिलवार (वय 36), रवी रमेश माचेवार (वय 35), गजानन ऊर्फ गजा भोलेनाथ मुगणे (वय 29) व प्रकाश बबलू वासनिक (वय 22, सर्व रा. नंदनवन झोपडपट्टी, नागपूर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. 

हे चौघे सोमवारी मध्यरात्री  साडेबारा-एकच्या सुमारास महाबळेश्‍वरला फिरायला आले. त्यांनी हॉटेलमध्ये रूम घेऊन आराम केल्यानंतर सकाळी ते फिरण्यासाठी बाहेर पडले. महाबळेश्‍वरची त्यांना काहीच माहिती नसल्याने त्यांनी स्थानिक गाईड सुरेश उगले यांना बरोबर घेऊन महाबळेश्‍वरमधील सर्व पॉईंट पाहिले. मंगळवारी  दुपारी ते शिवनेरी ढाब्यावर जेवायला थांबले. जेवण करून  ते पुन्हा महाबळेश्‍वरकडे येण्यास निघाले होते.  दरम्यान, नागपूर येथील हवाला प्रकरणात रोकडसह हस्तगत केलेल्या वाहनातील अडीच कोटी रुपयांचा अपहार करून फरार झालेल्या चार आरोपींचे मोबाईल लोकेशन पश्‍चिम महाराष्ट्र दाखवत असून ते सतत बदलत असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळत होती. त्यांनी ही खबर सातारा जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागास दिली.

त्यांनी आरोपींचे फोटो व त्यांच्याजवळील वाहनाचा नंबरही पाठवला. मोबाईल लोकेशन बदलत असताना सोमवारी रात्रीनंतर ते लोकेशन महाबळेश्‍वर दाखवत असल्याने नागपूर पोलिस आरोपींच्या शोधासाठी महाबळेश्‍वरकडे रवाना झाले. नागपूर पोलिसांनी दिलेली माहिती, वाहन नंबर व आरोपींचे फोटो महाबळेश्‍वर पोलिसांनी येथील अनेक व्हॉटसअप ग्रुपवर पाठवले. नागरिकांच्या सहकार्याने स्थानिक पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. 

दरम्यान, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आरोपींच्या शोधासाठी महाबळेश्‍वरकडे निघाले. दुपारी या पथकाला आरोपींचा सुगावा लागला. वेण्णा लेक येथे वाहनाचा शोध घेत असताना संशयितांचे वाहन महाबळेश्‍वरकडे गेल्याचे पोलिस पथकाने पाहिले व त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. आरोपी हे दि क्लब येथील चौकात पोहचले. तेव्हा दुचाकीवर असलेल्या पोलिसांनी आपले रिव्हॉल्वर रोखून दुचाकी आरोपींच्या  वाहनाला आडवी लावली. यावेळी मागील पोलिस अधिकार्‍यांनी आपल्याकडील रिव्हॉल्वर आरोपींवर रोखले. दरम्यान चारचाकीमधील पोलिस पथकही घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चालत्या वाहनातून बाहेर पडून आरोपींच्या गाडीला घेरले. काही क्षणांचा हा थरार आरोपींच्या वाहनात असलेल्या गाईड सुरेश उगलेने सांगितला.

पोलिसांनी आपल्याला घेरल्याचे पाहताच सर्वच आरोपींना आपला खेळ संपल्याचे जाणवले. पोलिस अधिकार्‍यांनी  आरोपींना ताब्यात घेवून  वाहनतळावर आणले. वाहनतळावर आरोपींची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे कोणतेही हत्यार आढळून आले नाही. मात्र, त्यांच्याजवळ 50 हजार रुपये रोख रक्कम, तसेच वाहनाच्या डिकीत रोकड भरून ठेवण्याच्या रिकाम्या तीन पिशव्या व एक मोठी बॅग आढळून आली. पोलिसांनी सर्व आरोपींना हॉटेलवर नेले. तेथे आरोपींकडे असलेल्या साहित्यात 2 लाख 32 हजार 680 रुपये, बॅ्रन्डेड नवीन  कपडे, शुज, गॉगल स्लिपर, बॅग,  अनेक सिमकार्डस आढळून आली.          

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस पथकात पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट, विकास जाधव, प्रसन्न जराट, सुरेंद्र पानसांडे, प्रविण फडतरे, मारूती लाटणे तर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविण गोरे, अमित माने, मोहन पवार, लक्ष्मण बुधावले यांचा समावेश होता.  आरोपींच्या चौकशीसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके  व पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे  हजर होते.

Tags : satara, satara news,  Nagpur Havala case,  Mahabaleshwar, Four people, arrested,