Mon, Oct 14, 2019 21:48होमपेज › Satara › अखेर ठरलं! साता-यात उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील

अखेर ठरलं! साता-यात उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील

Published On: Oct 01 2019 9:37AM | Last Updated: Oct 01 2019 9:42AM
सातारा : प्रतिनिधी

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या श्री. छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांचे नाव मंगळवारी सकाळी फायनल करण्यात आले. त्यानुसार श्रीनिवास पाटील आता गुरुवार दिनांक 3 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता उदयनराजे विरोधात श्रीनिवास पाटील असा चुरशीचा सामना रंगणार आहे.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे यांच्या विरोधात कोण मैदानात उतरणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून बराच खल सुरू होता. प्रारंभी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीची ही जागा काँग्रेसला सोडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मध्यंतरीच्या काही घडामोडीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी कराडातील मेळाव्यात आपण दोन दिवसात निर्णय जाहीर करू असे म्हटले होते. पाठोपाठ काँग्रेसकडून कराड दक्षिण विधानसभेसाठी पृथ्वीराज चव्हाणांचे नाव निश्चित झाले. दुसरीकडे श्रीनिवास पाटील यांनी मात्र लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. 

पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता गुरुवारी (दि. 3) रोजी श्रीनिवास पाटील सातारा लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील अशी ही रंगतदार लढत आता पाहायला मिळणार आहे.