Sat, Sep 22, 2018 03:25



होमपेज › Satara › सातार्‍यात राष्ट्रवादीचे पेट्रोलपंपावर अनोखे आंदोलन 

इंधन दरवाढीनंतर वाटले पेढे

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 10:46PM



शाहूपुरी : वार्ताहर

भाजप सरकारच्या पेट्रोल, डिझेल दरवाढीसंदर्भात ‘एक ही भूल, कमल का फूल’ अशी घोषणाबाजी करत सातारा येथील रेणुका पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी पेट्रोल दरवाढीसंदर्भात पेट्रोलपंपावर ग्राहकांना पेढे वाटून अनोखे अंदोलन करण्यात आले.

रेणुका पेट्रोल पंपासमोर दुपारी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध असो, मोदी सरकार हाय हाय, वाढत्या महागाईने सामान्य जनता त्रस्त, भाजपा सरकारचा धिक्कार असो, अशा विविध घोषणाही यावेळी देण्यात आल्या. 

केंद्रात  व राज्यात भाजपा - शिवसेना सरकार येवून 4 वर्षांच्या कालावधी झाला असून हे शासन कुठल्याच बाबतीत सर्वसामान्य जनतेला  न्याय देत नसल्याने विकासाच्या बाबतीत होणार्‍या जाहिरातीमध्ये सतत दाखवल्या जाणार्‍या खोट्या आकडेवारीमुळे सत्ताधार्‍यांवर जनता नाराज आहे. सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढीसंदर्भात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर कमी असताना दर कमी आकारणे आवश्यक  होते. या शासनाने देशात दर कमी केले नाहीत.उलट बाहेर भाववाढ झाल्यानंतर देशात रितसर दरवाढ सुरूच ठेवली. जनक्षोभ भडकल्यानंतर दर कमी करणार का? असा सवाल पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला. यावेळी राष्ट्रवादी 
पक्षाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांनाही निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुधीर धुमाळ, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, अतुल शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.