Mon, Sep 24, 2018 11:46होमपेज › Satara › राष्ट्रवादीचा हल्ला नव्हे, नुसताच बोलबाला 

राष्ट्रवादीचा हल्ला नव्हे, नुसताच बोलबाला 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

कर्जमाफीमध्ये शासनाने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे सांगत राष्ट्रवादीने कराडमधून सुरू केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा नुसताच बोलबाला झाल्याचे  शनिवारी दिसून आले.  जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार मोर्चा यशस्वी करण्यात कमी पडले तर श्री. छ. खा. उदयनराजे भोसले कराडमध्ये उपस्थित असूनही त्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली. 

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील त्यांच्या समाधीस अभिवादन करून भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. त्यामुळे या आंदोलनाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्यातच राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार हे चव्हाण साहेबांना अभिवादन करण्यासाठी कराडला येणार असल्याने त्यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात होईल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, तसे घडले नाही. 

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी हल्लाबोल आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर रान उठविले होते. राष्ट्रवादीने मोठा गाजावाजा केल्याने, तसेच सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने आंदोलनाला मोठी गर्दी जमेल असा सर्वांचाच कयास होता. मात्र, ज्या वेळी आंदोलनाला सुरुवात झाली. तेव्हा कुठे शेकड्यात लोकांची संख्या होती. सभास्थळी पोहोचल्यानंतरही यामध्ये फारसा फरक पडल्याचे दिसून आले नाही. दुसरीकडे भाजपच्या अभिवादन यात्रेला झालेली गर्दी पाहता बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचे कमी पडलेले प्रयत्न स्पष्टपणे दिसत होते. खा. शरद पवार यांच्या सूचनेनुसार भाजप सरकार विरोधात हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात कराडमध्ये करण्याचा निर्णय झाला. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन करण्यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले उपस्थित होते.