Fri, Jun 05, 2020 11:07होमपेज › Satara › श्रीनिवास पाटील यांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट

श्रीनिवास पाटील यांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट

Published On: Oct 01 2019 12:13PM | Last Updated: Oct 01 2019 12:13PM
कराड : प्रतिनिधी

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. उमेदवारी फायनल झाल्यानंतर मंगळवारी सकाळी श्रीनिवास पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन आ. चव्हाण यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. तसेच कराड उत्तरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचीही भेट घेऊन श्रीनिवास पाटील चर्चा करणार आहेत. तर, माजी आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार मकरंद पाटील यांच्यासह सातारा शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी आज श्रीनिवास पाटील भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, आ. बाळासाहेब पाटील हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी काढलेल्या रॅलीत श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील हेही सहभागी झाले आहेत. श्रीनिवास पाटील 1999 ते 2009 या कालावधीत सलग दोनदा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिनिधीत्व करत होते. 2013 ते 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपालही म्हणूनही कार्यरत होते. एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून माजी खासदार श्री. छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित होऊन ते विजयीही झाले होते.

मागील महिन्यात उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून आता सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील विरूद्ध माजी खासदार उदयनराजे भोसले अशी लक्षवेधी लढत होणार आहे.