Wed, Feb 19, 2020 10:53होमपेज › Satara › शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा अखेर राष्ट्रवादीला रामराम, भाजपमध्ये जाणार

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा अखेर राष्ट्रवादीला रामराम, भाजपमध्ये जाणार

Published On: Sep 12 2019 6:18PM | Last Updated: Sep 12 2019 9:37PM

खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसातारा : हरिष पाटणे  

राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (ता.१२) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मला भाजपमध्ये जावे लागत आहे, तुमच्या विषयी माझ्या मनात सदैव आदर असेल, तुमचे आशीर्वाद असुद्या असे म्हणून उदयनराजे यांनी पवारांचा निरोप घेतला.

खासदार उदयनराजे भोसले येत्या 14 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 15 तारखेला ते साताऱ्यात येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत सामील होणार आहेत. उदयनराजे यांच्या वतीने अधिकृतपणे ही माहिती देण्यात आली. त्यामुळे आता राष्ट्रवादीला आणखी मोठा जबर धक्का बसला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देण्याच्या मनस्थितीत असलेल्या साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची दस्तुरखुद्द शरद पवारांनी आज पुण्यात भेट घेऊन दोन तास चर्चा केली. या भेटीमध्ये उदयनराजेंची समजूत घालण्यात शरद पवार यशस्वी झाल्याची चर्चा रंगली, पण त्या बैठकीमध्येच त्यांनी पवारांचे आशीर्वाद घेतले. 

यावेळी पवारांसोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि साताऱ्यातील आमदार शशिकांत शिंदे यांचीही उपस्थिती होती. उदयनराजेंचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु, उदयनराजेंनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या विविध वक्तव्यांवरून ते खरोखरच भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशाही समांतर चर्चा सुरूच होत्या.    

उदयनराजे भोसले यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात उत्सुकता लागून राहिली होती. भाजपमध्ये प्रवेश करायचा की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे? याबाबत त्यांनी समर्थकांशी चर्चा केली होती. अखेर आज त्यांनी भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.