Thu, Apr 25, 2019 05:39होमपेज › Satara › शरद पवारांवर बोलण्याची मुख्यमंत्र्यांची औकात आहे का?

शरद पवारांवर बोलण्याची मुख्यमंत्र्यांची औकात आहे का?

Published On: Apr 09 2018 1:30AM | Last Updated: Apr 08 2018 10:45PMदहिवडी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अच्छे दिनच्या नावाखाली गोरगरीब जनतेची फसवणूक केली. कर्जमाफीचे नियम बनवताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय? शरद पवार साहेबांवर बोलण्याची तर मुख्यमंत्री फडणवीस यांची औकात आहे का? अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान, चार वर्षे जनतेची फसवणूक करणार्‍या भाजप सरकाचा वर्धापन दिन 6 एप्रिल ऐवजी 1 एप्रिल करावा, अशी टिका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. दहिवडी, ता. माण येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा आला. यावेळी आयोजित सभेत आ. अजितदादांनी भाजप शासनाच्या कारभारावर चौफेर टिका केली.

अजितदादा म्हणाले, दुष्काळी भागाचे प्रश्‍न सोडवण्याकरता आघाडीचं सरकार असताना अनेक कामं केली. सिमेंट बंधार्‍यांसाठी दहा-दहा कोटी दिले. डी.पी.सी.चा निधी वाढवला पण आपल्या विचाराचं सरकार सत्तेत नसेल तर शेतकरी कसा भरडून निघतोय हे आज आपण पाहतोय. शेतीमालाचे भाव पडलेत, खताच्या किमती वाढल्यात. हे सरकार शेतकर्‍यांच्या मुळावर उठलंय. कर्जमाफी करताना साडेचार लाख भरा मग दीड लाख देतो असे म्हणणार्‍यांना अक्कल आहे का नाही?  हजारो कोटींचे भ्रष्टाचार करणारे देशाबाहेर पळून गेले. अशीच परिस्थिती राहिली तर प्रत्येकाच्या डोक्यावर 15 लाख कर्ज होईल.

स्व. यशवंतराव चव्हाण यांचे दुष्काळी माणला पाणी देण्याचे स्वप्न होते. ते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सत्तेत असताना पूर्णत्वास नेत होतो. माणचे नेते स्व. सदाशिवराव पोळ व खटावचे नेते स्व. भाऊसाहेब गुदगे यांनी यासाठी वारंवार पाठपुरावा ही केला. परंतु, हे सरकार निधी देत नाही. या घोटाळेबाज सरकारच्या, महागाईच्या व जनतेच्या पिळवणुकीविरोधात आमचा हल्लाबोल आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार निवडून आणण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये आरक्षण देतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी सत्ता येण्यापूर्वी बारामतीत आश्‍वासन दिले होते. सत्ता येऊन 150 कॅबिनेट बैठका झाल्या तरी काहीच केले नाही. खा. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत हा विषय मांडला तर प्रशासनाने असा कोणताही प्रस्ताव सरकारपुढे नसल्याचे सांगितले. आमच्या सरकारच्या काळात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे काम अंतिम टप्प्यात होते. त्याबरोबर मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचाही निर्णय झाला होता. जुन्या आरक्षणाला हात न लावता नवीन आरक्षण धोरण अंतिम टप्प्यावर असतानाच आमचे सरकार गेले. त्यानंतर आलेल्या जाती-धर्मात तणाव निर्माण करणार्‍या सरकारने स्व. चव्हाण साहेबांनी निर्माण केलेले त्रिस्तरीय पंचायतराज मोडीत काढण्याचे प्रयत्न केले आहेत, असेही आ. अजित पवार म्हणाले. 

धनंजय मुंडे म्हणाले, चार वर्षे जनतेची फसवणूक करणार्‍या सरकारचा वर्धापन दिन 6 एप्रिल ऐवजी 1 एप्रिल करा. जनता दररोज एप्रिल फुल होत आहे. भाजपच्या नेत्यांना अटलजी, अडवणीजी, प्रमोद महाजन यांच्या नावाचा विसर पडला असून स्वत:च्या नेत्यांशी गद्दारी करणारे जनतेशी काय इमान राखणार? पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची लायकी तरी आहे का? 

सुनील तटकरे म्हणाले, हे सरकार शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देत नाही. शेतकर्‍यांना ऑनलाईनच्या रांगेत उभे करणार्‍या सरकारला ऑफलाईन करा. समर्थ महाराष्ट्र घडवण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.

हल्लाबोल सभेमध्ये खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आ. प्रभाकर घार्गे, जिल्हाअध्यक्ष सुनिल माने यांनी मार्गदर्शन केले. आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, राज्याच्या अध्यक्षा चित्राताई वाघ, मा. खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, माण-खटावचे अध्यक्ष डॉ. संदीप पोळ, महिला आघाडी अध्यक्षा कविता म्हेत्रे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत, सुरेंद्र गुदगे, जि.प. सदस्या भारती पोळ, जि.प. सदस्या सोनल पोळ, सुरेखाताई पखाले, यांच्यासह शेकडो प्रमुख कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विक्रमी गर्दीने बाजारपटांगण भरुन गेले होते.

राष्ट्रवादीतील ‘फ्लेक्सवॉर’ वर अजितदादांची नजर

राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होत असताना पक्षात भेदभाव नको. पक्षातील नेत्यांची वेगवेगळी पोस्टर्स पाहून अजितदादांनी मागील आठवणी सांगत पूर्वीच्या काही गद्दारांना खडेबोल शरद पवार साहेबांनी सुनावल्याची आठवण करुन दिली. खा. शरद पवार यांचे निकटवर्तीय स्व. सदाशिवराव पोळ यांनी अनेकांना आमदार केले. परंतु ते स्वत: विजयी होवू शकले नाहीत, याची खंत साहेबांना आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत सातारा-सांगली मतदार संघात मताधिक्य असताना शेखर गोरेंचा झालेला पराभवही राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला असून या दोन्ही घटनांचा विचार करता आगामी काळात माण-खटावमध्ये पवारसाहेब देतील तो उमेदवार निवडून आणण्यासाठी एकी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

माणच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवर प्रभाकर देशमुखांचा हल्लाबोल

प्रभाकर देशमुख म्हणाले, तालुक्याला कायमस्वरुपी हक्काचे पाणी  मिळण्यासाठी जिहे-कठापूर योजनेची अपूर्ण व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत. उरमोडी योजनेची शिल्लक कामे पूर्ण करुन खटाव-माणला उन्हाळ्यात पाणी द्यावे. माण खटावमधील स्थलांतर थांबवण्यासाठी तरुणांना व महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी एमआयडीसीची मंजुरी मिळावी, शेतकर्‍यांच्या पिकाला हमीभाव मिळावा, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी, यासाठी स्वामीनाथन आयोगाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा हल्लाबोल आहे. तालुक्यात क्रीडा संकुलाचे काम मार्गी लावण्यासाठी व तालुक्यात 100 कॉटचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी शासनाने तातडीने निधी द्यावा यासाठी हल्लाबोल असल्याचे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यावेळी म्हणाले.या  आंदोलनात सर्वसामान्यांच्या समस्यांवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. माणमध्ये पाणी समस्या असल्यामुळे, उद्योगधंदे नसल्यामुळे तरुणांच्या हाताला काम नाही. कर्जमाफी व वीजमाफी शंभर टक्के व्हावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.