Fri, Apr 26, 2019 10:09होमपेज › Satara › शेखर गोरेंच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीर

शेखर गोरेंच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दहिवडी / म्हसवड : प्रतिनिधी

शेतात साध्या बांधावरून भांडणे होतात, वरकुटे-मलवडीत तर चार एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न झाला होता. संबंधित शेतकर्‍याला प्रशासन न्याय देत नसल्याने शेखर गोरे लढले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित काम बंद पाडले. मात्र, शेतकर्‍याच्या फिर्यादीवरून कंपनीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी जनतेच्या मनातल्या  नेतृत्वावर मोक्का लावला आहे. सरकारने हा रडीचा डाव खेळला असला तरी शेखर गोरेंच्या पाठीशी जिल्हाच नव्हे तर राज्याची राष्ट्रवादीही खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.

शेखर गोरे यांच्यावरोधात षडयंत्र रचून मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. त्या निषेधार्थ दहिवडीत आयोजित केलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आ. प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुरेखा पखाले, संदीप  घोरपडे, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, पं. स.  सभापती रमेश पाटोळे, सतीश मांडवे, नितीन राजगे, नगराध्यक्ष तुषार वीरकर, सुभाष नरळे, युवराज सूर्यवंशी, अशोक माळी, सोनलताई गोरे उपस्थित होते.

आ. शिंदे म्हणाले, शासनाने संघटीत गुन्हेगारी, अतिरेकी कारवाई, समाजाला विघातक लोकांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी. टँकर व चारा छावण्यांना स्वखर्चातून निधी देणारा खंडणी मागेल का? सरकार  अघोषित आणीबाणीसारखे हुकुमशाही पद्धतीने काम करतंय. लोकनेतृत्व मोडण्याचे काम सुरू आहे. जनतेच्या सहनशिलतेचा अंत न पाहता मोक्काबाबत फेरविचार करावा. 

माजी आ. प्रभाकर घार्गे म्हणाले, शेखर गोरे यांच्यावरील राजकीय द्वेषापोटी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठीची सर्वांनी एकत्र येऊन लढूया. सत्तेचा वापर दबावतंत्रासाठी होत आहे.  सत्ता येते व जाते, याचा विचारही सत्ताधार्‍यांनी करावा.

संदीप घोरपडे म्हणाले, शेखर गोरे यांनी जनतेच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याबरोबरच अनेकांना नोकरीस लावले. जनतेसाठी पाच वर्षे मोफत टँकर, अ‍ॅम्ब्युलन्स देणार्‍या, जलसंधारण कामे करणार्‍या शेखर गोरे यांच्यावर झालेला खोटा गुन्हा रद्द करावा.

सौ. सुरेखा पखाले म्हणाल्या, घटनेप्रसंगी फिर्यादी विशाल पट्टेबहादूर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात होता तर शेखरभाऊही परराज्यात होते. पोलीस प्रशासन चुकीची कारवाई करत असली तरी न्यायदेवतेवर अजून आमचा विश्‍वास आहे. गोरेंना मोका लावा म्हणणार्‍या येळगावकर यांना जनतेने कधीच मोका लावलाय. ते ज्या गाडीतून फिरताहेत  ती गाडी कोणी दिली ते बोलायला लावू नका. शेखरभाऊ  स्वखर्चातून जनतेसाठी कामे करतात, तुमच्यासारखे ठेवीदारांचे पैसै नाहीत बुडवत, असा टोलाही सौ. सुरेखा पखाले यांनी लगावला. सुनील माने, कविता म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप पोळ, बाबासाहेब पवार, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजसिंह शिंदे, तानाजी कट्टे, बाबुराव काटकर, सुनील पोळ, विजयकुमार मगर, दादासाहेब चोपडे, तानाजी मगर, बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते.

अनेक पदाधिकारी यांचे राजीनामे

माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पंचायत समिती सदस्य, सर्व बाजार समितीचे संचालक, खरेदी विक्री संघाचे चेअरमन व सर्व सदस्य,राजकीय पदाधिकारी यांनी आपापल्या पदाचे राजीनामे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे देऊन शेखर गोरे यांच्यावर झालेल्या अन्यायकारक गुन्हा मागे घ्यावा, यासाठी पक्षाने प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे. याबाबत आ. शिंदे म्हणाले, शेखर गोरेंवरील प्रेमाखातर पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले,  आम्ही त्यांचा मान ठेवतो.