Sun, May 26, 2019 09:00होमपेज › Satara › ‘चिमूट’भर राष्ट्रवादीत ‘मूठभर’ मतभेद 

‘चिमूट’भर राष्ट्रवादीत ‘मूठभर’ मतभेद 

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 11:29PMउंडाळे : वैभव पाटील

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या जिल्हयातील बहुतांश सत्‍तास्थाने राष्ट्रवादीकडे आहेत. पण राष्ट्रवादीला कराड दक्षिण हा एकमेव मतदार संघ व त्या मतदारसंघाची सत्‍तास्थाने मिळाली नाहीत. सध्याही दक्षिणमध्ये राष्ट्रवादी अशक्त आहे. दक्षिणेत राष्ट्रवादी बाळसे धरण्याअगोदरच अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागले आहे. चिमूटभर राष्ट्रवादीत मुठभर मतभेद पहायला मिळत आहेत. 

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचा इतिहास पहात या मतदार संघावर 70 ते 75 वर्षापासून काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. या मतदार संघाचे नेतृत्व दिग्गज मंडळीनी केले. आज या मतदार संघाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करत असून या पूर्वी सलग 35 वर्षे माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर आणि तत्पुर्वी ज्येष्ठ विचारवंत माजी मंत्री यशवंतराव मोहिते यांनी नेतृत्व केले आहे. आज या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. या मतदार संघात काँग्रेस विचाराबरोबर राष्ट्रवादीला मानणारा मोठा गट आहे. स्व. विलासराव पाटील वाठारकर हे राष्ट्रवादीचे संस्थापक जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या पश्‍चात या पक्ष़ाला दक्षिणेत सक्षम नेता आणि नेतृत्व मिळाले नाही. वाठारकरांच्या नंतर त्यांचे पूत्र राजेश पाटील यांनी काहीसे प्रयत्न केले, पण अपेक्षित यश साधता आले नाही.  

कृष्णा सह. साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने कृष्णेचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांना हेरले. तरीही माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी अविनाश मोहिते गटाला थेट विरोध करून भाजपाचे नेते विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश  भोसले यांच्या पॅनेलला मदत केली. अविनाश मोहिते गट सत्‍तेतून पाय उतार झाला. या गटाने उंडाळकरांची साथ सोडून थेट शरद पवार यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश केला. पुतणे राजाभाऊ पाटील यांनी विलासराव काकांना आव्हान देत उंडाळेतच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादीला दोन युवा नेते मिळाले. त्यांच्या माध्यमातून व जिल्हयातील वरिष्ठ पदाधिकारी, आमदार यांच्या माध्यमातून पक्ष चांगली उभारी घेईल असे चित्र निर्माण झाले. पण जि. प. व पं. स.च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला भोपाळाही फोडता आला नाही. येथे उंडाकर विरोधात डॉ. अतुल भोसले यांच्यात सरळ लढत झाली. राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस पिछाडीवर पडली. इतकेच काय पण अ‍ॅड. राजाभाऊ पाटील हे ही मोठया फरकाने जि.प. निवडणुकीत पराभूत झाले. पराभवानंतर राष्ट्रवादीने बोध घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज होती पण प्रत्यक्षात घडले वेगळेच.

अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांनी पक्ष 

श्रेष्ठींना विचारून दक्षिण मतदार संघात दौरा केला. या दौर्‍यात राजाभाऊंनी अविनाश मोहिते यांना कुठेही बोलावले नाही. अगदी रेठरे सह नजीकच्या कृष्णाकाठी राजाभाऊ  यांनी अविनाश मोहितेंचे कार्यकर्ते घेऊन सभा, बैठका पूर्ण केल्या. अविनाश मोहिते यांनी वरिष्ठ नेत्यांना याबाबत विचारणा केली तेंव्हा वरिष्ठांनीही एकत्र काम करा असे सांगितले आहे. पण राजाभाऊंनी मात्र अविनाश मोहिते यांना वगळून मतदार संघाचा दौरा पूर्ण केला. 

राजाभाऊंच्या दौर्‍यानंतर अविनाश मोहिते यांनीही उंडाळे जि. प.मतदार संघात साळशिरंबे, टाळगाव  या गावात राजाभाऊ पाटील यांना वगळून बैठका, सभा घेतल्या. दोन नेत्यांच्या स्वतंत्र सभा, बैठकांमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत.