Tue, Jul 16, 2019 11:37होमपेज › Satara › राष्ट्रवादीच्या तोफा सातार्‍यात धडाडणार

राष्ट्रवादीच्या तोफा सातार्‍यात धडाडणार

Published On: Apr 08 2018 2:19AM | Last Updated: Apr 07 2018 11:15PMसातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणारी हल्लाबोल यात्रा 8 व 9 एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यात धडकणार असून, पक्षाच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. बालेकिल्ल्यात या आंदोलनाद्वारे जोरदार शक्‍तिप्रदर्शन करण्याची तयारी राष्ट्रवादीने केली असून त्याद‍ृष्टीने अवघा जिल्हा बैठकांच्या माध्यमातून नेत्यांनी पिंजून काढला आहे.

‘सरकार नाही भानावर राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर’, अशा जय्यत तयारीने 2 एप्रिलपासून कोल्हापूर येथून राष्ट्रवादीच्या हल्‍लाबोल यात्रेला प्रारंभ झाला. ही हल्‍लाबोल यात्रा सातारा जिल्ह्यात रविवारी (दि. 8) येत आहे. यात्रेचे  स्वागत झाल्यानंतर माण  तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने   सुमारे 1 हजारहून अधिक मोटार सायकलची रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर  दहिवडी ता. माण येथे सकाळी 11 वाजता जाहीर सभा होणार आहे. माण-खटाव तालुक्यातील वातावरण ढवळून काढल्यानंतर  ही यात्रा कोरेगाव तालुक्यात प्रवेश करणार  आहे. तेथेही सुमारे 5 हजार मोटार सायकलची रॅली निघणार असून दुपारी 3 वाजता कोरेगाव येथे जाहीर सभा होणार आहे.

कोरेगावनंतर हल्लाबोल यात्रा सातार्‍याकडे येणार आहे. या यात्रेचे सातारा विधानसभा मतदार संघात आगमन झाल्यानंतर त्याचे स्वागत बॉम्बे रेस्टारंट चौकात आ. शिवेंद्रराजे भोसले  करणार आहेत. त्यानंतर सुमारे 3 हजार मोटारसायकलची दुचाकी रॅली काढून ही यात्रा राजवाडा गांधी मैदानावर पोहोचणार आहे. रात्री 6 वाजता सातारा येथे गांधी मैदान राजवाडा येथे भव्य सभा होवून ही यात्रा कराड येथे मुक्कामी जाणार आहे.  गांधी मैदानावरील या सभेत वरिष्ठ नेते मंडळींच्या तोफा धडाडणार आहेत. या सभेत राष्ट्रवादीचे नेते भाजपा व शिवसेनेवर कशा पद्धतीने हल्‍लाबोल करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

सोमवार दि. 9 एप्रिल रोजी सकाळी  कराड येथील यशवंतराव चव्हाण  यांच्या स्मृतीस्थळी यात्रा जावून तेथे अभिवादन करून यात्रा पाटणला पोहाचणार आहे. तेथे 11 वाजता जाहीर सभा करून ही यात्रा उंब्रजला येणार आहे. तेथून दुपारी 3 वाजता ही यात्रा पाचवडमार्गे वाईला पोहोचणार आहे. तेथे सायंकाळी 6.30 वाजता सभा घेवून ही यात्रा पुणे येथे मुक्कामी जाणार आहे.

या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात दोन दिवसात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खा. विजयसिंह मोहिते- पाटील, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे, आ.जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दिलीप वळसे-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांच्या तोफा चांगल्याच धडाडणार आहेत.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसह पदाधिकार्‍यांनी हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने गावोगावी बैठका घेवून जास्तीत जास्त कार्यकर्ते व नागरिक सहभागी होतील, यासाठी मोठी तयारी केली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात हल्लाबोल यात्रेची चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे.

Tags : satara, satara news, NCP attack, Satara district, April 8 and 9,