Sun, Aug 25, 2019 13:00होमपेज › Satara › उदयनराजेंच्या वाढदिवसावर राष्ट्रवादीचा बहिष्कार (Video)

उदयनराजेंच्या वाढदिवसावर राष्ट्रवादीचा बहिष्कार (Video)

Published On: Feb 24 2018 5:51PM | Last Updated: Feb 24 2018 10:40PMसातारा : प्रतिनिधी

पक्षविरोधी भूमिका आणि पदाधिकार्‍यांना सन्मानजनक वागणूक   दिली जात नाही; अशी तक्रार करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व  आमदार व  बहुतांश पदाधिकार्‍यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या सत्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकला. त्यांच्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला असून पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतरही उदयनराजेंबाबतची स्थानिक  नेतेमंडळींची नाराजी कायमच राहिली. 

खा. उदयनराजे भोसले यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि जिल्हा परिषद मैदानावर नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सोहळ्याला जायचे की नाही यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच  मतभेद होते.  त्यातच उदयनराजेंच्या निमंत्रण पत्रिकेतून प्रारंभी ना. रामराजे ना. निंबाळकर व विक्रमसिंह पाटणकर यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा नव्याने निमंत्रण पत्रिका काढून ना. रामराजे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. सत्कार सोहळ्यासाठी खा. उदयनराजे यांनी स्वत: ना. रामराजे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह पक्षाच्या नेतेमंडळी व पदाधिकार्‍यांना निमंत्रण दिले होते. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहणार याची उत्सुकता लागून राहिली होती. 

प्रत्यक्ष सत्कार सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी काही तास अगोदर शरद पवार सातार्‍यात दाखल झाले. महामार्गावरील प्रिती हॉटेलमध्ये ते थांबले होते. यावेळी ना. रामराजे ना. निंबाळकर यांच्यासह  खा. विजयसिंह मोहिते -पाटील, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. नरेंद्र पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, सत्यजितसिंह पाटणकर, सुनील माने, वसंतराव मानकुमरे व अन्य पदाधिकार्‍यांनी हॉटेल प्रितीकडे धाव  घेतली.

दुपारी 3च्या सुमारास राष्ट्रवादीच्या या नेतेमंडळींची शरद पवार यांच्यासमवेत बैठक सुरू झाली. या बैठकीला प्रसारमाध्यमांना मात्र प्रवेश नाकारण्यात आला. बैठकीत खा. उदयनराजे यांच्याबाबत आमदार व काही पदाधिकार्‍यांनी नाराजी दर्शवली. खा. उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले  असले तरी त्यांच्याकडून नेहमीच पक्षविरोधी भूमिका घेतली जाते. त्यांच्याकडून पक्षातील नेते, आमदार व पदाधिकार्‍यांना सन्मानजनक वागणूक दिली जात  नसल्याचा आरोप केला गेला. त्याचवेळी सत्कार सोहळ्याला उपस्थित न राहण्याबाबतची भूमिका मांडण्यात आली. 

शरद  पवारांनी सर्व पदाधिकार्‍यांना नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती बैठकीत केली. तरीही  बहुतांश आमदारांनी कार्यक्रमास  उपस्थित राहण्याबाबत नकार दर्शवला. पवारांनी नाराज मंडळींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही नाराज आमदार व पदाधिकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. 

बैठक संपता संपता खा. उदयनराजे यांनी अचानक एंट्री केली. त्यानंतर पाच मिनिटातच शरद पवार, खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासमवेत खा. उदयनराजे हॉटेलमधून बाहेर पडले. ते थेट सभास्थळी रवाना झाले. त्यानंतर काही वेळातच आ. शिवेंद्रराजे, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील हेही आपल्याला अन्य कार्यक्रम असल्याचे सांगत निघून गेले. 

दरम्यान, प्रत्यक्ष सभेला खा. शरद पवार, खा. मोहिते-पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुभाषराव शिंदे, बाळासाहेब सोळस्कर यांच्याशिवाय  पक्षातील अन्य कोणीही प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहिली नाहीत.