Wed, Jan 22, 2020 19:10होमपेज › Satara › शरद पवार माढ्यातून लढणार

शरद पवार माढ्यातून लढणार

Published On: Feb 14 2019 1:36AM | Last Updated: Feb 14 2019 1:36AM
सातारा : हरीष पाटणे  

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला असून बुधवारी विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी पवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याच्या शपथा माढा मतदारसंघातील प्रमुख नेतेमंडळींनी घेतल्या. गुरुवारी माढा मतदारसंघातील प्रमुख मंडळी पवारांना भेटणार असून त्यानंतर शरद पवार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करतील, असे खात्रीशीर वृत्त आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा पवारांनी केली होती. मात्र, देशात निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्रिशंकू लोकसभा झाली तर पवारांना अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर होण्याची संधी मिळू शकते, अशी अटकळ बांधून पवारांच्या किचन कॅबिनेटमधील सहकार्‍यांनी पवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याची गळ घातली. पुण्यात चार दिवसांपूर्वी पवारांनी स्वत:च या विषयावर भाष्य केले होते. माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह या मतदारसंघातील प्रमुखांनी आपणाला पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढावी, अशी इच्छा व्यक्‍त केली आहे, असे पवार बोलून गेले होते तेव्हाच पवार भीष्म प्रतिज्ञा मोडणार हे निश्‍चित झाले होते. बुधवारी त्या दिशेने मुंबईत वेगवान घडामोडी घडल्या. विधान परिषदेचे सभापती व माढा मतदारसंघात समाविष्ट असलेले फलटणचे नेते रामराजे ना. निंबाळकर यांनी या विषयात पुढाकार घेतला. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मुंबई येथील निवासस्थानी माढा मतदारसंघातील सर्व प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांची विस्तृत भूमिका रामराजेंनी सर्व नेतेमंडळींसमोर मांडली. खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. गणपतराव देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, रश्मी बागल, माजी आमदार दीपक साळुंखे हे या बैठकीला उपस्थित होते. पवारांना मोठ्या मताधिक्याने माढा मतदारसंघातून निवडून देण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेऊया, असे एकमताने ठरवण्यात आले. शिवाय त्यांच्या प्रचाराची धुरा     रामराजे ना. निंबाळकर, विजयसिंह मोहिते-पाटील, प्रभाकर देशमुख यांच्यासह काँग्रेसमधील प्रमुखांनीही संभाळावी, असे बैठकीत ठरले.  

माढा मतदार संघाचा पसारा मोठा असल्याने प्रत्येक गावात प्रचारासाठी पवारांना जाता येणार नाही. त्यातच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह महाआघाडीची जबाबदारी पवारांकडेच असल्याने त्यांना देशभरात राहुल गांधी यांच्या बरोबरीने फिरावे लागणार आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या अनुपस्थितीमुळे  कोणताही दगाफटका होणार नाही याची खात्री सर्वांनी द्यावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.  सर्व प्रमुख नेत्यांनी जबाबदारी स्वीकारली तरच शरद पवार निवडणुकीला हो म्हणणार आहेत. कार्यकर्ते व प्रचार यंत्रणा चार्ज होण्यासाठी पवारांचे प्रत्यक्ष निवडणुकीत असणे महत्वाचे ठरणार असल्याने आपण सर्वजण त्यांना गळ घालू, असेही या बैठकीत सांगण्यात आले. 

गुरूवारी माढा मतदार संघातील ही प्रमुख मंडळी शरद पवारांना भेटणार असून त्याचवेळी पवारांच्या माढा मतदार संघातील उमेदवारीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे बैठकीतील सुत्रांनी सांगितले. 

रामराजेंनी घेतली मोहिमेची सूत्रे

महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखले जाणारे विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर यांनी पवारांच्या माढा मोहिमेची सूत्रे हातात घेतली आहेत. त्यांनीच काल माढा मतदारसंघातील सर्व प्रमुखांना फोनाफोनी करून त्यांच्याच निवासस्थानी बैठक बोलावली. या बैठकीत रामराजेंनी शरद पवार यांची अधिकृत भूमिका मांडली. जर आपण सर्वांनी एकदिलाने काम करणार असू तरच शरद पवार लढतील. त्यामुळे आजच सर्वांनी जे असेल ते स्पष्टपणे सांगावे, अशा सूचना रामराजेंनी केल्यानंतर सर्वांनीच शरद पवारांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ, असे सांगितले. रामराजेंनी हाच निरोप शरद पवारांपर्यंत पोहोचवला. माढा मतदारसंघात रामराजेंना मानणार्‍या फलटण व माणचा समावेश होतो. शिवाय नाईक निंबाळकरांच्या मालकीचा किल्लाही  माढ्यात आहे. रामराजेंचे बंधू, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांनीही पक्षाने जबाबदारी दिली तर आपण माढ्यातून लढू, असे म्हटले होते. त्यानंतरच वेगवान घडामोडी घडत गेल्या व माढ्याच्या मोहिमेची सूत्रे रामराजेंच्या हातात आली. 

माढ्यातून लढण्यासाठी माझेच निमंत्रण : मोहिते-पाटील

विजयसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी सायंकाळी आपणच शरद पवार यांना माढा मतदारसंघात उभे राहण्याचे निमंत्रण दिल्याचे म्हटले आहे. आवडत्या माणसांवरच आपण हक्क सांगतो. तसा मी पवार साहेबांचा आवडता आहे. कोणीही वेगळा विचार करायचा नाही. पवार साहेबांना निवडून द्यायचे आहे. मी स्वतः व जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी मिळून शरद पवार यांना या मतदारसंघात उभे राहण्याचे निमंत्रण दिले आहे. केंद्रात कोणत्याच पक्षाचे स्पष्ट बहुमत होणार नाही. त्याठिकाणी पवारसाहेब असणे गरजेचे असल्याचे विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले.