Thu, Jun 27, 2019 13:40होमपेज › Satara › निवडणुकीपर्यंत सगळ्यांची कॉलर खाली येईल : शरद पवार

निवडणुकीपर्यंत सगळ्यांची कॉलर खाली येईल : शरद पवार

Published On: May 09 2018 4:42PM | Last Updated: May 09 2018 4:44PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले हे कॉलर उडवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नंतरच्या काळात विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांनीही कॉलर उडवून दाखवली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनीच आज सातार्‍यात पत्रकार परिषदेत कॉलर उडवून दाखवली. निवडणुकीपर्यंत इथल्या सगळ्यांची कॉलर खाली होईल, अशी फटकेबाजीही पवारांनी केली. 

रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीत शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. नरेंद्र मोदी, राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण, तिसरी आघाडी अशा एका पाठोपाठ एक विचारलेल्या तिरकस प्रश्नांना पवारांनी थेट व सडेतोड उत्तरे दिली. सातार्‍यात शरद पवार आले आणि पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजेंच्या अनुषंगाने प्रश्न झाला नाही असे कधीच घडत नाही. आता तर पवारांच्या पत्रकार परिषदेला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. पत्रकारांनी खासदार उदयनराजे व राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये असलेला पेच कसा सोडवणार? असा थेट प्रश्न विचारला. त्यावर  दिलखुलास हसत पवार म्हणाले, कसला पेच? पेचबीच काही निर्माण होत नाहीत, मी आलो की सगळे सरळ होतात. 

शरद पवारांच्या या उत्तरावर पत्रकारांनी या सगळ्यावर उतारा काय? असा प्रतिप्रश्न केला असता उतार्‍याची गरज नाही. निवडणुकीपर्यंत सगळे एका दोरीत येतील, असे पवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी स्वत:च्या कॉलरला हात लावला. कॉलर उडवली, कॉलर खाली घेताना पवार म्हणाले, निवडणुकीपर्यंत सगळ्यांची कॉलर खाली येईल. आमदारपण सरळ चालतील. पवारांच्या या विधानाचा सगळेजण आपापल्या पद्धतीने सोयीस्कर अर्थ काढत आहेत.